बियाणे सदोष निघाल्याने बारा शेतकऱ्यांना भरपाई

आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून विद्यापीठ आणि महामंडळास दोषी धरले. बियाणे खरेदीची एकूण रक्कम एक लाख ५६ हजार ७९० रुपये, तसेच बियाणे खरेदी केल्यापासून त्यावर दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज, शेतकऱ्यास आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १५ हजार, तक्रारीचा खर्च तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon

नगर ः बियाणे सदोष निघाल्याने १२ शेतकऱ्यांना तीन लाख ७२ हजार ७९० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदानी, सदस्या चारुशीला डोंगरे, एम. एन. ढाके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने ही भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे.

नगर जिल्ह्यातील राहाता आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील शेतकरी मच्छिंद्र चौधरी, मच्छिंद्र घोलप, किशोर बनकर, बद्रीनाथ गाढवे, मंदा गाढवे, संतोष कुदळे, संभाजी कुंदे, रामनाथ भवार, दादासाहेब सोनटक्के, राजेंद्र भवार, संजय भवार, सुभाष करीर यांनी २०१६ मध्ये महात्मा फुले विद्यापीठ (राहुरी) यांनी उत्पादित केलेले आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने विक्री केलेले सोयाबीनचे जे. एस. ९३०५ या वाणाचे बियाणे खरेदी केले होते.

शेतकऱ्यांनी हे बियाणे पेरल्यानंतर बहुतांश बियाणे उगवले नव्हते. शेतकऱ्यांनी महात्मा फुले विद्यापीठ आणि बियाणे महामंडळाकडे याबाबत तक्रार केली होती. कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये सरासरी २४ टक्केच बियाणे उगवल्याचा अहवाल दिला होता. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी मागणी विद्यापीठ आणि बियाणे महामंडळाकडे केली होती. त्यांना भरपाई न मिळाल्याने अॅड. श्‍याम असावा यांच्यामार्फत नगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून विद्यापीठ आणि महामंडळास दोषी धरले. बियाणे खरेदीची एकूण रक्कम एक लाख ५६ हजार ७९० रुपये, तसेच बियाणे खरेदी केल्यापासून त्यावर दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज, शेतकऱ्यास आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १५ हजार, तक्रारीचा खर्च तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

बियाण्यांची उगवणक्षमता ही जमिनीचा पोत, हवामान, तापमान, पेरणी पद्धत, पाण्याचा नियमितपणा, पुरेसा पाणीपुरवठा, खते, औषधे, कीटकनाशके आदी घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे भरपाई देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचा दावा विद्यापीठ व बियाणे महामंडळाने केला होता. तो दावा मात्र अॅड. श्‍याम असावा यांनी खोडून काढला.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीकडे बियाणे उगवण क्षमतेची तक्रार केली होती. या समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली होती. त्यामध्ये २४ टक्के बियाणे उगवले आहे, असा अहवाल त्यांनी सादर केला होता. या खटल्यात हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला असे तक्रारदार शेतकऱ्यांचे वकील ॲड. श्‍याम असावा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com