खानदेशात अति उष्णतेमुळे केळीबागा होरपळू लागल्या

४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद; घड सटकण्याची समस्या, उत्पादनावर परिणाम
 Banana
BananaAgrowon

जळगाव : खानदेशात मागील १५ ते २० दिवसांपासून उष्णतेत (Summer) सतत वाढ दिसत आहे. केळी (Banana) बागा ४० अंश सेल्सिअस तापमानापुढे तग धरण्यास असमर्थ होत असून, लहान व निसवलेल्या बागांवर या तापमानाचा (temperature) प्रतिकूल परिणाम झाला आहे. घड सटकण्याची समस्या अनेक भागात तयार झाली आहे.
मुख्य रस्ते किंवा डांबरी रस्त्यावरील बागांमध्ये कोवळे घड काळे-पिवळे पडून खराब होत आहेत. तापमानात यंदा मार्चमध्येच अधिकची वाढ दिसत आहे. कमाल ४५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान खानदेशात नोंदविण्यात आले आहे. केळी पट्ट्यात म्हणजेच जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार आदी तालुक्यांमध्ये अति उष्णतेमुळे केळीला फटका बसला आहे.

 Banana
पाणीटंचाईसह उष्णतेमुळे केळी बागा धोक्यात

मुबलक पाणी (Water) किंवा सिंचन असतानादेखील लहान किंवा तीन महिन्यांच्या बागांमध्ये कोवळी पाने होरपळली आहेत. सकाळी ११ पासूनच ऊन (Summer) तापू लागले आहे. सायंकाळी पाचपर्यंत उष्ण वारे असतात. रात्री ९ पर्यंत उष्ण वारे वाहतात. खानदेशात निसवलेली किंवा महिनाभरात कापणीवर येणारी केळी सुमारे ३० हजार हेक्टरवर आहे. तर लहान किंवा जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केलेली केळी सुमारे पाच हजार हेक्टरवर आहे. या सर्वच बागांना उष्णतेचा फटका बसत आहे. यंदा मार्चमध्ये सरासरी तापमान अधिक नोंदविण्यात आले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस होते.

यंदा हे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढून ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. यातच मार्चच्या सुरवातीला कमी तापमान होते आणि अखेरीस तापमान थेट ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. तापमानात मोठी वाढ काही दिवसांत झाल्याने केळी बागांचा टिकाव अशक्य झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उत्पादनात किमान २० ते २२ टक्के घट होणार आहे. मुख्य रस्त्यावरील बागांमध्ये बांधावरील किंवा पश्‍चिम, दक्षिण भागातील केळी (Banana झाडांना (Tree) फटका कमीअधिक फटका बसला आहे. या भागातील केळी काळी-पिवळी पडली आहे. त्यांची काढणी होणार नाही. त्यांचे नुकसान आजघडीला १०० टक्के गृहीत धरले जात आहे. ज्या बागांना पाणी कमी पडले, त्या बागांमध्ये घड सटकण्याची समस्या आहे. अनेक शेतकऱ्यांनी(Farmer) उष्णतेपासून बागांच्या बचावासाठी पश्‍चिम व दक्षिण बाजूला हिरवी नेट किंवा नैसर्गिक वारा अवरोधक म्हणून शेवरी, संकरित (उंच वाढणारे) गवत याची व्यवस्था, लागवड केली आहे. यामुळे बागांचा बऱ्यापैकी बचावही झाला आहे. परंतु जेथे वारा अवरोधक किंवा हिरवी नेटची व्यवस्था नाही, त्या बागांमध्ये नुकसान ३० टक्क्यांवर दिसत आहे.

केळी बागांभोवती हिरव्या नेट उष्णतेपासून संरक्षणासाठी लावल्या आहेत. संकरित गवतदेखील आहे. परंतु यंदा उष्णता अधिक असल्याने बागेत नुकसान होत आहे. तापमानात मार्चमध्येच अधिक वाढ झाली आहे. ४० अंश सेल्सिअस तापमान केळीला मानवते. यावरील तापमानात बागांना वाचविण्यासाठी मोठी सर्कस करावी लागते.

- विशाल महाजन, केळी उत्पादक, नायगाव, जि. जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com