Crop Damage : शेतात मातीच उरली नाही, शेती करू कशी?

एक सप्टेंबरला सायंकाळी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. परिसरात बंधारे फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आले. शेताला लागून असलेला सोनार ओहोळ काही क्षणात दुथडी भरून वाहू लागला. हे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली गेली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : एक सप्टेंबरला सायंकाळी ढगफुटीसारखी (Rain Like Cloudburst) परिस्थिती निर्माण झाली. परिसरात बंधारे फुटल्याने (Barrage Burst) मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आले. शेताला लागून असलेला सोनार ओहोळ काही क्षणात दुथडी भरून वाहू लागला. हे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली (Crop Under Water) गेली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने त्यासोबत ढोबळी मिरची, टोमॅटो लागवडी (Vegetable Crop Wash Out) वाहून गेल्या. तार बांबूसहित मल्चिंग पेपर, ठिबक साहित्य असे सगळे काही मातीसह सोबत वाहून गेले. ‘शेतात आता खडक उघडा पडला आहे. आमच्यावर जणू हा निसर्ग कोपला. आता शेतात मातीच उरली नाही, तर शेती करू कशी? अशी व्यथा वडगाव (ता. सिन्नर) येथील शेतकरी किसन गंगाधर सांगळे यांनी हुंदके देत मांडली.

Crop Damage
Crop Damage : सव्वासात लाख हेक्टरला फटका

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सोनांबे, कोनांबे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला; मात्र त्याचा फटका या गावांसह पाणी वाहून येणाऱ्या सोनारी, वडगाव या गावांनाही बसला. पाऊस होऊन आठवडा झाला तरी अनेक शिवारांमधून पाणी वाहत आहे. सोयाबीन पिकांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने ते पिवळे पडले आहे, भाजीपाला पिके काही ठिकाणी सडली आहेत.

Crop Damage
Crop Damage Survey : पुणे जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार

सांगळे कातरत्या आवाजात म्हणाले, की कर्ज काढून दहा गुंठे क्षेत्रावर पॉलीमल्चिंग व ठिबक करून ढोबळी मिरची लागवड तर दोन एकरवर टोमॅटो लागवड केली होती. ही लागवड तार बांबूने बांधली होती; मात्र पुराचे पाणी शिवारात घुसले आणि सार काही क्षणातच उद्ध्वस्त झालं. ढोबळी मिरचीचे क्षेत्र माती खरडून वाहून गेले. तर टोमॅटोचे ७० टक्के नुकसान झाले आहे. आता शेतात काळी मातीच नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतीतील माती वाहून गेली, अन् आता खडक उघडा पडला, त्यावर इथून पुढं शेती करायची कशी, आता हे सगळ पुन्हा उभे कस करायचे आणि प्रपंच कसा चालवायचा? नेहमीच होणारे नुकसान नकोसे झाले आहे. निसर्ग कोपला आता मार्ग कसा निघणार, आता या संकटात कुणाला काहीही सांगता येईना.

हा डोंगराएवढा मोठा प्रश्न, कोणी समजून घेईल का?

नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतील; मात्र शासकीय यंत्रणा पंचनामे करून नेमके करणार तरी काय? शेवटी देऊन देऊन देणार तरी काय, आम्हालाच पुन्हा आमच्या पायावर कुठून आणि काहीतरी करून उभे राहावे लागणार आहे. शेतात खडक उघडा पडला, आता यात माती टाकावी लागणार आहे; मात्र माती आता आणायची कुठून अन् पुन्हा जमीन तयार करायला माती देणार कोण, हा डोंगराएवढा मोठा प्रश्न आहे ते कोणी समजून घेईल का? असा सवाल सांगळे यांनी शासनाला केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com