Lumpy Skin Disease : वाहतूक बंदीमुळे जनावरांची रात्री होतेय खरेदी-विक्री

प्रादुर्भावग्रस्त भागातून जनावरांसह चारा वाहतुकीलाही बंदी
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्री
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीAgrowon

सूर्यकांत नेटके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर ः कोरोनातून नागरिक सावरत असताना आता जनावरांवर ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराचे मोठे संकट आले आहे. त्यामुळे जनावरांचे आठवडी बाजार, पशुप्रदर्शन, खरेदी-विक्री व प्रादुर्भावग्रस्त भागातील वाहतुकीवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी व्यापारी दिवसाएवजी रात्री जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या बाबत एका शेतकऱ्यानेच ‘ॲग्रोवन’ला ही माहिती दिली.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. अकोले, श्रीरामपूरपासून सुरवात झाली. आता संपूर्ण जिल्हा या आजाराने व्यापला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १४ तालुक्यांतील ५३ गावांत सुमारे २०० जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ जनावरे दगावली. जिल्ह्यात पहिल्यांदा १० ऑगस्टला अकोले तालुक्यात ‘लम्पी स्कीन’ग्रस्त जनावरे आढळली. त्यानंतर श्रीरामपूरमध्ये शिरकाव झाला होता. पशुसंवर्धन विभागाने नगर जिल्ह्यात गाई-म्हशी वर्गातील सोळा लाखाच्या जवळपास पशुधन आहे.

खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्री
Lumpy Skin : लंपी स्किन आजाराला कसं रोखाल ?| ॲग्रोवन

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. संजयकुमार कुमकर यांनी वेगाने उपाययोजना सुरु केल्या. आतापर्यंत १ लाख ५० हजार जनावरांना लसीकरण केले आहे. निर्बंध घातले. मात्र जिल्ह्यात रात्री खरेदी-विक्रीचे व्यवहार करून वाहतूक होत असल्याची माहिती एका शेतकऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर ‘ॲग्रोवन’ला दिली. पारनेर भागातून गाई-म्हशी नेवासा भागात आणून रात्री सौदे करून थेट शेतकऱ्यांच्या घरी जनावरे पोच केली जात असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे वाहने तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे. या बाबत कोणताही अधिकारी बोलायला तयार नाही.

वैरण वाहतुकीलाही बंदी
‘लम्पी स्कीन’चा फैलाव थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणून शनिवारी (ता.१०) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नव्याने आदेश काढले आहेत. प्रादुर्भावग्रस्त गावांतील गोठा परिसरातून चारा, वैरण वाहतुकीलाही बंदी घातली आहे. आता सर्व जिल्हा लम्पी आजाराने व्यापला आहे. प्राण्याचे शव, कातडी व जनावरांच्या शरीराच्या कोणत्याही भागाची वाहतूक करता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com