मेघराजा धोंडीलगाजा...

जसं पवशा चांगला तसा कोकीळचा आवाज कितीबी चांगला असला तरी कुळव कुळव असं ती म्हणत्या. ती असं म्हणटली की कुळव मारतंय असं वाटून कोणतर दगडं मारायची.
मेघराजा धोंडीलगाजा...
Rain SeasonAgrowon

श्रेणिक नरदे-

पाऊस पाणी पडू दे
आभाळ दाणी वाहू दे
खळ भरलं दाण्यानं
आभाळ भरलं पाण्यानं.
मेघराजा धोंडीलगाजा...

हे गाणं आज्जी म्हणत्या. तिचा त्यातला खोल आवाज ऐकला की वाटतंय आता पाऊस (Rain) येईल. जुन्या काळातली ही गाणी (Old Song) कुठंतर आज्ज्यांच्याकडंच ऐकायला मिळत्यात.

पावशा घु पावशा घु
पावशाला नावं ठेवुन खाणार काय गु ?
असं पण म्हणटलं जायच.

पाऊस येतोय काय नाही हे बघायला दोन कौल लावायच्या पद्धती. एक फक्त पावसासाठीच हाय. ती म्हणजे चंकोबा. पुर्वी चंकोबा घिवून एक बतलं पोरगं यायच आणि बरोबर त्याची आई किंवा आज्जी असायची. मग ते फक्त पूजत. हळदकुकु लावायचं आणि धान्य द्यायचं. चंकोबा म्हणजे काय तर शेणापासून शंकू आकार तयार करतात आणि वरती हाराटीचा तुरा खवलं की चंकोबा झाला.

घरातला चंकोबा बारका असतो. वाटीत बसंल एवढा. चंकोबाला वाटीत बसवायचं. थोडी जमिन सारवून घ्यायची. आणि उदकाडी लावून हळदकुकु लावून म्हणायचं- आज उद्या पवूस पडला तर चंकोबा बस. असं म्हणत वाटी फिरवून पालथी घालून पाया पडायचं. आणि थोड्या वेळानं वाटी शिस्तात उचलायची. एकतर चंकोबा बसला तरी भारी वाटायचं आणि परत दोनतीनदा परत तसं करायचं. खरं पहिला कुणाचा हातगुण चांगला असंल त्यानंच वाटी घ्यायची. असं करून पडला तरी घरातल्या सगळ्यानी चंकोबा एक फेर तर करायचं. चंकोबा बसला तर त्याला गोठ्यात ठेवायचं पडला तर रानात निवून ऊन खात बसवायचा.

कधीतरी वारा आभाळं झालं की मी आज्जीला उगंचंच खेकटं करून चंकोबा बसवायला लावायचो. तो बरोबर बसला आणि दुपारला पाऊस आला की संध्याकळी भजी खायला मिळायची.

दुसरी पद्धत चढ उतार.
ही पद्धत कौल लावायला सगळीकडं वापरतात. घरात यल्लमा लक्ष्मी कुठली तर देवी येत्याच. ती आली की तिला सुपभरून जुंधळं घातलं की ती त्या देवीच्या जगातलं मुठभर धान्य परत देत्या. कधीकधी तीच बाई कौल लावत्या. चार दिवसांत पाऊस पडला तर चढून ये नाहीतर उतरून ये, असं म्हणून थोडं धान्य जुंधळं बोटात धरायची आणि जमिनीवर ठेवायची. त्यात दोनदोनच्या जोड्या करायच्या. शेवटीला एक हाच्चा राहिला तर कौल लागला. मग पाऊस येतोय. जर सगळ्या जोड्या जुळल्या तर त्यला काय किमंत नसते.
त्याला चढून येणं उतरून येणं म्हणतात. चढून आलं तर पाऊस येतो.
पुढं ज्यावेळला पेरणी होते त्यावेळी ते धान्य धनं मिसळून पेरतात.

जसं पवशा चांगला तसा कोकीळचा आवाज कितीबी चांगला असला तरी कुळव कुळव असं ती म्हणत्या. ती असं म्हणटली की कुळव मारतंय असं वाटून कोणतर दगडं मारायची.
...

जसं हे तसंच नक्षत्राचीही गमचा हाय.
रोहिणी: हा पाऊस पडला तर पडला. शक्यतो पडत नाही. आढोळी पाऊस असतो. याचं वाहन गाढव असतं कधी कधी.
मृग (मिरग) : मिरगाच्या पावसाची सगळी वाट बघतात. मोरांचा आवाज यावेळी लै फूटतो. यात जर पाऊस पडला तर पेरणी हूते. चांगला पाऊस पडला तर ऊसाची मिरगी लावण हूते. ज्याचा वापर पुढं बेण्यासाठी केला जातोय. कधी याचं वाहन बेडूक असतंय. लहान असताना बेडकाची पिल्ली ढगातनं पावसाबरोबर पडत्यात असं मोठी माणसं सांगायची आणि खरं पण वाटायचं ते.
आर्द्रा (आडद्रा) : ह्या नक्षत्रात पाऊस होतोच. मागास पेरण्या हुत्यात. आगाप झालेल्या पेरण्यांना हा पाऊस वाढवतो. पिक मस्तीवर जायचा धोकाही असतो. शेंगा मस्तीवर जातात. वेल वाढत्या पण शेंगा उतरत नहीत. कधी उंदीर वाहन असतं. उंदीर वाहन असल्यास पिकाचा धूडकूस होतो.
पुनर्वसु (तरणा पाऊस) : तरण्यावर घरची जबाबदारी असते, त्याला पडावं लागतं. बहूतेकदा हा पाऊस चांगला पडतो. कधीतरच दगा करतो.
पुष्य (म्हातारा) : या पावसात थंड वारं सुटतं. म्हातारी लोकं मरत्यात. ह्यात जर एखादं घायट्याला आलं असलं आणि जगलं तर त्याला पुढलं वर्षभर कायच होत नही.
आश्लेषा : (सूनचा पाऊस): नवऱ्यानं आणि सासऱ्यानं काय केलं नसलं की सून खमकी होते आणि गाढा ओढते. ती म्हणत्या, मामाजी तुमी चला हळूहळू मी येतो सुळूसुळू. हा पाऊस सुळसूळू येतो. उसाला महत्वाचा असतो. सुळकीत पाणी गेलं की ऊस वर येतो. कधी मेंढा वाहन असतंय. मेंढा वाहन असलं की टकरीचा पाऊस येतो. खालतीकडनं वरतीकडनं दोन्ही बाजूनं येवून टकरी हुते.
मघा : (मोघा) : पडला तर मोघा, नहीतर ढगाकडं बघा, नहीतर चुलीपुढं हागा.
मघा पाऊस पडला तर एकदम जोराचा पडतो. नहीतर पडतच नही. पण ज्यावेळी पडतो त्यावेळी हागायला सूद्धा बाहेर जाऊ द्यायचा नही इतका पडतो.
पुर्वा : पुर पुर पुर्वा. पादल्यासारखं कधीतर शिडकावा मारून हा पाऊस गायब होत असतो.
उत्तरा (उतरा) : उतरा आणि भात खाईना कुत्रा, असं म्हणटलं जातं.
हस्त : (हातका, हात्ती) : हात्ती आणि पाडंल भित्ती. ह्या पावसात हातका खेळायची मज्जा. हातका पोरींचा खेळ, पण आमच्या घाटगेबई स्त्रीपुरूष समानतावादी असाव्यात. त्या आम्हाला हातक्याचा डबा वेगळा घेऊन यायला लावायच्या. कुणाच्यातर पाटीवर हात्तीचं चित्र काढायचं. मध्ये सगळी डब्बं ठेवायची त्यावर हात्ती ठेवायचं. आणि हातात हात घालून गोलगोल फिरत

आडबाई आडोणी
आडातलं पाणी काढोणी
आडात होती देवळी
देवळीत होती सुपारी
आमचा हातका दुपारी
आडात होती कात्री
आमचा हातका रात्री
आडात होता खराटा
आमचा हातका मराठा !

असं म्हणायचं. मग एकेकाच्या डब्यात काय असेल वळकायचं. ओळखता येत नसलं की कंटी देऊन सांगायचं. मग सगळीजण एकमेकाला आपल्या डब्यातलं वाटायचं आणि खायचं. अशी मज्जा हुती. हातका आवडायचा.

चित्रा: (कुड्य मळी, आंधळा पाऊस) : कन्नड मध्ये कुड्य मळी म्हणून म्हणतात. आंधळा पाऊस. डोळं उघडल तिथं आंधळं पाऊस पाडेल. हा पाऊस किलोमीटर अंतराच्या फरकानं असतो आणि नसतोही.
स्वाती : पडल सामी स्वाती पिकंल माणिक मोती. हा पाऊस पडला तर पिक चांगलं येतं. माणिक मोत्यासारखं.
विशाखा : (विषाचा पाऊस ): शेवटच्या नक्षत्रात पाऊस कमी पडतो. या पावसात जर कुणाला सड, खोडवा, लोखंड, प्राण्यांचा चावा वगैरे लागलं असेल तर विष चढतंय, असं म्हणतात.
...

हा सगळा पाऊस आनंदाचा. शाळा चुकवायचा, पेरणी करायचा, गार भिजायचा, मऊ गरम झोपायचा, काळ्याकुट्ट ढगाकडं बघत बसायचा. रस्त्याला आसरा शोधायचा. ओढ्यात खेळायचा, मासं पकडायचा. वगळ बांधायचा, रानातलं पाणी काढायचा. असा ओढा चालू असतो जानेवारीपर्यंत. यावर दिवाळी दसऱ्याला घर सारवून काढताना धुणं धुवायला नवराबायको ओढ्यावर. अन् पोरं डुबकी मारायला. कधी जोराचा ओढा येऊन संपर्क तुटतो. पण मला पाऊस आवडतो...!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com