
Mira Bhayandar: मिरा भाईंदरमध्ये गायीच्या आठ वासरांना लम्पी या चर्मरोगाची लागण (Lumpy Skin Disease) झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील सर्व जनावरांचे लम्पीचे लसीकरण (Lumpy Vaccination) करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांना या आजाराची लागण झाली आहे.
याची गंभीर दखल घेत सर्व जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिकेने जारी केले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
राज्यात लम्पीची लाट आली असताना मिरा-भाईंदर शहरात एकाही जनावरला लम्पीची लागण झाली नव्हती. खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील सर्व जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांचे शंभर टक्के लसीकरण केले होते.
मात्र त्यानंतरही आठ वासरांना लम्पीची लागण झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या सर्व वासरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
त्यांच्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू असून त्यांचा आजार नियंत्रणात आहे, अशी माहिती महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांनी दिली.
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे पालिकेने ही बाब गांभीर्याने घेत गोशाळा व जनावरे बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यानुसार शहरातील गोपालक, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, गोरक्षण संस्था यांनी ज्या ठिकाणी जनावरे पाळली आहेत. त्या ठिकाणापासून ती अन्य कोणत्याही ठिकाणी नेता येणार नाहीत.
आयुक्तांचा इशारा
जनावरांना मोकाट सोडता येणार नाही, गुरांचा आणि म्हशींचा बाजार भरवणे, त्यांची शर्यत लावणे, त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करणे याला सक्त मनाई करण्यात आली आहे.
या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अन्यथा प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.