
Nagar DCC Bank News नगर ः राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस व शिवसेनेचे मिळून १४ संचालक असताना सहा संचालक असलेल्या भाजपकडून (BJP) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांच्या जिव्हारी लागला आहे.
घुले आज (ता.१४) शेवगाव येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन मन मोकळे करणार आहेत. रविवारी (ता.१२) प्रमुख सहकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर सोशल मीडियावर ‘नवे परिवर्तन करू, मला आपल्याशी बोलायचे,’ अशा पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामुळे घुले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे महुणे आहेत. नगर जिल्हा सहकारी बॅंकेत आतापर्यंत बहुतांश वेळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. ॲड. उदय शेळके यांच्या निधनामुळे यंदाही निवड बिनविरोध होईल असेवाटत होते. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकही झाली.
अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव निश्चित झाले. मात्र निवडीवेळी अचानक भाजपने माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी निवडणूक लढवून फुटीर संचालकांच्या मदतीने अध्यक्षपद हिसकावले.
महाविकास आघाडीचे १४ संचालक असतानाही झालेला पराभव चंद्रशेखर घुले यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. काँग्रेस व शिवसेनेचा एकही संचालक फुटला नाही, असा दावा केला आहे, म्हणजे राष्ट्रवादीकडूनच राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची चर्चा सुरू आहे.
कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादीवर’च निशाणा
जिल्हा सहकारी बॅंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाल्यानंतर घुले यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच निशाणा साधला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्यासह समर्थकांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी करण्याची आणि फुटीर संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावरून घुले यांचा रोख पक्षांतील जबाबदार पदाधिकाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.