Electricity : वीज दरवाढीविरुद्ध वीजग्राहक व औद्योगिक संघटना समितीचा आंदोलनाचा इशारा

राज्यातील वीज (Electricity) ग्राहकांवर इंधन समायोजन आकारच्या नावाखाली २०% दरवाढ लादली जात आहे, असा आरोप वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने केला आहे.
Electricity
Electricity Agrowon

मुंबई - राज्यातील वीज (Electricity) ग्राहकांवर इंधन समायोजन आकारच्या नावाखाली २०% दरवाढ लादली जात आहे, असा आरोप वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने केला आहे. महावितरण कंपनी (Mahavitran Company) आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे समितीने प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. याविरोधात ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन समिती देणार आहे. वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करावी. इंधन समायोजन आकाराची अचूक तपासणी करण्यात यावी. अदानीचे (Adani) देणे फेडण्यासाठी ४८ हप्ते घ्यावेत व लागणाऱ्या रकमेची तरतूद राज्य सरकारने करावी, अशा समितीच्या मागण्या आहेत.

"प्रत्येक जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतकरी व अन्य सर्व ग्राहक संघटनांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी हे आंदोलन यशस्वी करावे" असे आवाहन राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने प्रताप होगाडे, (Pratap Hogade) आशिष चंदाराणा, डॉ. अशोक पेंडसे, हेमंत कपाडिया, एड. सिद्धार्थ वर्मा, सचिन चोरडिया, भरत अग्रवाल, मुकुंद माळी, प्रमोद खंडागळे, हर्षद शेठ, विक्रांत पाटील, ललित बहाळे, रावसाहेब तांबे इ. प्रमुखांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जुलै २०२२ पासून पुढील पाच महिन्यांसाठी हा दरवाढ आकारण्यात येणार आहे. दरमहा १३०७ कोटी रुपये म्हणजे सरासरी १.३० रु प्रति युनिट याप्रमाणे सर्व ग्राहकांवर लादण्यात आलेली आहे. ऊन्हाळ्यातील मार्च ते मे २०२२ या तीन महिन्यांच्या काळामध्ये वीज खरेदी खर्चातील वाढ अनुक्रमे मार्च ११० कोटी रुपये, एप्रिल ४०८ कोटी रुपये व मे ९३० कोटी रुपये याप्रमाणे वाढीस आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच एप्रिल २०२२ च्या हिशोबामध्ये अदानी पॉवरचे (Adani Power) ५०% देणे भागविण्यासाठी ६२५३ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मंजुरी ७७६४ कोटी रुपये आहे. त्यामधील ५ महिन्यांतील वसूली ६५३८ कोटी रुपये आणि राहिलेली १२२६ कोटी रु. वसूली पुढील काळात म्हणजे डिसेंबरपासून होणार आहे, असा दावाही समितीने पत्रकात केला आहे.

यापैकी अदानी पॉवरचा कायद्यातील बदल (Change in Law) या अंतर्गत केंद्र सरकारचा वस्तू व सेवा कर आणि कोल इंडियाचा स्थलांतर सुविधा आकार (Evacuation Facility Charge) या संबंधित अतिरिक्त खर्चाच्या मागणीचा दावा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अंतिम निर्णयानुसार अदानीच्या बाजूने झाला आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने थकबाकीची ५०% रक्कम त्वरित भागवावी असे आदेश दिले आहेत. फक्त अदानीचा एकट्याचा एकूण बोजा २२३७४ कोटी रुपये आहे. यापैकी ८४१२ कोटी रुपये यापूर्वीच डिसेंबर २०२१ पर्यंत इंधन समायोजन आकारावाटे देण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम देण्यासाठी आता राज्य सरकारने विलंब भरणा नियम २०२२ अंतर्गत विनाव्याज ४८ हप्ते घेणे व सदर रकमेची तरतुद करणे आवश्यक आहे, असेही समितीने पत्रकात सांगितले.

अदानी प्रमाणेच समान स्वरूपाचा करार असल्यामुळे 'रतन इंडिया' (Ratan India) या कंपनीचाही दरफरक बोजा अटळ आहे. त्याशिवाय महावितरण कंपनीतर्फे मध्यावधी फेर आढावा याचिका आयोगासमोर सप्टेंबर नंतर दाखल होणार आहे. यावेळी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन कोरोना वर्षांतील नुकसान व अन्य अपेक्षित दरफरक वा खर्चवाढ यासाठी कंपनीकडून किमान २०००० कोटी रु वा अधिक दरवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर एप्रिल २०२३ पासून पुन्हा प्रचंड दरवाढीचा बोजा पडणार आहे. सप्टेंबर नंतरच्या या लढाई साठीही ग्राहकांनी तयारीत रहावे असेही आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

इंधन समायोजन आकाराच्या एकूण हिशोबामध्ये वीज वितरण गळती १४% च्या ऐवजी मार्चमध्ये ३५%, एप्रिलमध्ये ३०% व मेमध्ये २६% याप्रमाणे दाखवून सरासरी ३०% गळतीस मान्यता देण्यात आलेली आहे. महावितरणची गळती १४% ऐवजी सरासरी ३०% टक्के कशी मान्य करण्यात आली हेही न उलगडणारे कोडे आहे. गेली १० वर्षे आम्ही महावितरण, आयोग व राज्य सरकार यांना गळती ३०% हून अधिक आहे हेच सातत्याने सांगत आहोत. पण कांही सकारात्मक निर्णय व सुधारणा होत नाहीत. पण येथे गळती सहज ३०% मान्य केली जाते. ही सोयीस्कर मान्यता आहे. प्रत्यक्षात १६% टक्के जादा वीज खरेदीला या मार्गाने मान्यता दिली जात असेल तर तेही चुकीचे आहे. कंपनी गळती १४ टक्के आहे असे म्हणते तर मग त्यावरील अतिरिक्त गळती १६% टक्के या गळतीमुळे होणाऱ्या संपूर्ण नुकसानीचा बोजा महावितरण कंपनीवर टाकण्यात आला पाहिजे. अशी मागणीही समितीने केली आहे.

राज्यामध्ये २०१६ पासून वीज अतिरिक्त आहे. २०२२ साली ३००० मेगावॉट अतिरिक्त वीज आहे हे आयोगानेच आपल्या ३० मार्च २०२० च्या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. अतिरिक्त क्षमतेच्या स्थिर आकारापोटी राज्यातील सर्व ग्राहक नोव्हेंबर २०१६ पासून दरमहा प्रति युनिट ३० पैसे जादा भरत आहेत. अतिरिक्त वीज असताना वीज खरेदी खर्च वाढतो, याचा अर्थ प्रत्यक्षात सर्व प्रकल्पांतून पूर्णपणे वीज निर्मिती होत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे कमी पडणारी वीज बाजारातून विकत घेतली जाते आणि जादा खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला जातो हे पूर्णपणे चुकीचे आहे. हा कमी उत्पादनामुळे वाढणारा संपूर्ण बोजा संबंधित अकार्यक्षम निर्मिती कंपन्यावर टाकण्यात आला पाहिजे, असेही समितीने सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com