Electronic Cluster : रांजणगाव एमआयडीसीत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर

रांजणगावच्या (जि. पुणे) औद्योगिक वसाहतीमध्ये २९७.११ एकर क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाचे क्लस्टर उभारण्यात येणार असून यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
Electronic Cluster
Electronic Cluster Agrowon

नवी दिल्ली ः रांजणगावच्या (जि. पुणे) औद्योगिक वसाहतीमध्ये २९७.११ एकर क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाचे क्लस्टर (Electronic Cluster) उभारण्यात येणार असून यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment In Electronic Production) केली जाईल. यातून ५००० जणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी घोषणा इलेक्ट्रॉंनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज केली. उद्योग प्रकल्प बाहेर जाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असताना रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनाचे (Electronic Products) क्लस्टरसाठी केंद्राने दिलेल्या मंजुरीने राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सेमीकंडक्टर डिझाईनचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुण्यातील सी-डॅकच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक आणि औद्योगिक प्रोत्साहनाची ‘फ्यूचर डिझाईन योजना’ राबविली जाणार आहे.

Electronic Cluster
Tata Airbus : ३ महिन्यात ४ मोठे प्रकल्प राज्याबाहेर

कोविड संकटानंतर जगभरातील इलेक्ट्राॉनिक उद्योग पुरवठा साखळीसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहत आहेत. त्याअंतर्गत तामिळनाडू, नोएडा (उत्तर प्रदेश), कर्नाटक तसेच तिरुपती येथेही इलेक्ट्रॉनिक्स हब विकसीत झाले आहेत. याअंतर्गत आता महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी हे क्लस्टर महत्त्वाचे ठरेल. यात किमान दोन ते तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा राजीव चंद्रशेखर यांनी केला.

महाराष्ट्रातील राजकीय वादाचा संदर्भ सोईस्कररित्या टाळताना राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रांजणगावच्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सातत्याने पाठपुरावा करत होते, असे आवर्जून नमूद केले. उद्योग पळविले जाण्याच्या मुद्द्याला बगल देताना मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, की सर्वत्र स्पर्धा आहे. चीनमधून बाहेर पडून उद्योग भारतात न्यावा की व्हिएतनाममध्ये न्यावा याची स्पर्धा आहे. तर भारतात आल्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरुपती येथे जावे की की महाराष्ट्रात जावे यातही स्पर्धा आहे.

Electronic Cluster
Tata Airbus : ‘टाटा एअरबस’ गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोप

गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्याराज्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. इलेक्टॉनिक उत्पादन, सेमिकंडक्टर उत्पादन ही एक-दोन वर्षाची नव्हे तर प्रदीर्घ काळाची संधी आहे. एक कंपनी एका राज्यात आली किंवा दुसऱ्या राज्यात गेली याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. या कंपन्यांसाठीचे स्टार्टअप महाराष्ट्रातही आणि गुजरातमध्ये सुरू होतील. इलेक्ट्रॅनिक उत्पादनाचा १.५ ट्रिलियन डॉलरचा हिस्सा सर्व राज्यांच्या वाट्याला येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

केंद्राच्या ईएमसी २.० (इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात उभारले जाणारे हे पहिलेच क्लस्टर असेल. याआधी आंध्रप्रदेशातील वायएसआर, कोपार्थी आणि हरियानातील आयएमटी, सोहना येथील क्लस्टरना मंत्रालयाने मागील वर्षी मंजूरी दिली होती. रांजणगावच्या क्लस्टरमध्ये आयएफबी रेफ्रिजरेशन लिमिटेड या मुख्य कंपनीने (अॅंकर क्लायन्ट) ४० एकर क्षेत्र ताब्यात घेऊन बांधकाम सुरू केले आहे. या कंपनीची गुंतवणूक ४५० कोटी रुपयांची असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. तर २९७.११ एकर क्षेत्रापैकी २०० एकर भूखंडातील जागा इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन तसेच पुरवठा साखळीच्या पुरक उद्योगांसाठी राखीव असेल. येथे येणाऱ्या उद्योगांनी ३२ महिन्यात उत्पादन सुरू करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, सेमीकंडक्टर उत्पादनासाठीच्या स्टार्टअप योजनेबद्दल मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले, की सेमीकंडक्टरसाठी २०२१ मध्ये ७६ हजार कोटी रुपयांची योजनेचीही पंतप्रधानांनी घोषणा केली होती. याअंतर्गत सेमीकंडक्टर डिझाईनचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुण्यातील सी-डॅक संस्थेच्या माध्यमातून या स्टार्टअपला आर्थिक आणि औद्योगिक प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी सी-डॅकमार्फत एक हजार कोटी रुपयांची "फ्यूचर डिझाईन योजना" सुरू करणार. या योजनेला दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. यासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य केंद्र सरकारचे असेल. यासाठी लवकरच रोड शो देखील केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

असे असेल रांजणगावचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर

क्लस्टर विकासासाठी अपेक्षित एकूण खर्च - ४९२.८५ कोटी रुपये

केंद्र सरकारचे आर्थिक योगदान - २०७.९८ कोटी रुपये

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आर्थिक हिस्सेदारी - २८४.८७ कोटी रुपये

क्लस्टरमध्ये अपेक्षित गुंतवणूक - २००० कोटी रुपये

क्लस्टरची रोजगार निर्मिती क्षमता - ५००० रोजगार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com