कमलापूरचे हत्ती बाहेर जाऊ देणार नाही ः आत्राम

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
कमलापूरचे हत्ती बाहेर जाऊ देणार नाही ः आत्राम
Elephant Agrowon

अहेरी, जि. गडचिरोली : येथील सुदृढ हत्ती (Elephant) त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून काढून परराज्यात पाठवून हे पर्यटनस्थळ (Tourism) बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडला जाईल. प्रसंगी रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम दिला. विशेष म्हणजे कमलापूर व पातानील येथील हत्ती स्थलांतराविरोधात विविध राजकीय पक्षांचे नेते पुढे येत असून त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, राज्य सरकार जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्याऐवजी नावारूपास आलेले कमलापूर पर्यटन स्थळ मोडीत काढत आहे. पण या क्षेत्राचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री मुग गिळून गप्प आहेत. त्यांनी यासाठी एक शब्दही न काढणे व विरोध न करणे हे या जिल्ह्याचे दुर्दैवच आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनीही या स्थलांतराला विरोध केला असून ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून हत्तींच्या स्थलांतरणावरून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. राज्यातील वनवैभव व एकमेव पर्यटनस्थळ वाचविण्यासाठी आता सर्वचजण सरसावल्याचे चित्र आहे. नक्षल्यांचे माहेरघर म्हणून सुप्रसिद्ध असलेला कमलापूर परिसर दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हत्ती कॅम्पमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला. राज्यातील कानाकोपऱ्यांतून येथे पर्यटक भेट देतात. त्यामुळे नक्षली कारवाया देखील कमी झाल्या. येथील नागरिकांना नवा रोजगार मिळाला. असे असताना हे हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने वाढविण्याचे सोडून हळूहळू कॅम्प बंद करण्यात येत आहे. हा डाव येथील जनता यशस्वी होऊ देणार नाही.

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा आदेश समाजमाध्यमांद्वारे बाहेर पडला होता. त्या काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनविभागाची आकस्मिक बैठक घेऊन आदेश काढण्याबद्दल निर्देश दिल्याची चर्चा होती. आता केंद्राकडून ना हरकत मिळाल्यानंतर पुन्हा आदेश काढण्यात आला. संपूर्ण घडामोडी सुरू असताना पालकमंत्र्यांचे मौन सर्वकाही सांगून जात आहे. जंगल गेले, जमीन चालली आणि आता जनावर (हत्ती) सुद्धा राज्यशासनाच्या आशीर्वादाने जातील. स्थानिक जनतेने हजारो वर्षांपासून जपलेली वनसंपत्ती हे सरकार चुटकी सरशी लंपास करत आहे, असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार म्हणाले की, वनविभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशात येथील हत्ती अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे, मात्र हे खोटे असून उलट नैसर्गिक अधिवासात त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या मोकळ्या वातावरणातून हत्तींना हजार किमी लांब बंदिस्त वातावरणात नेमण्याचे औचित्य काय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

‘‘कमलापूर, पातानील व ताडोबा येथील १३ हत्ती गुजरात येथील जामनगरला नेण्याचा घाट हा केंद्र सरकारने घातला आहे. पंतप्रधान मोदींचे परममित्र अंबानी यांना हे हत्ती देखभाल करण्यासाठी दिले जाणार आहेत. यात राज्य शासनाचा कोणताही सहभाग नाही. केंद्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर यात राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे. काही राजकीय पक्षांची मंडळी कोणतीही सत्य माहिती न घेता स्थानिक आमदार व राज्य सरकारच्या नावाने बोंबा मारत आहेत. पर्यटन व जनभावनेचा आदर करीत आपणही हत्ती स्थलांतराला विरोध करू.
धर्मरावबाबा आत्राम आमदार, विधानसभा क्षेत्र, अहेरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com