
भडगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाळ्यात गिरणा व तापी नदीतून (River) किती पाणी वाया (Waste of Water) गेले असेल, हे ऐकाल तर तुम्ही पण थक्क व्हाल! तीन महिन्यांत पावसाचे (Rain) या दोन्ही नद्यांतून तब्बल ११ हजार ७११ दलघमी म्हणजे ४१४ टीएमसी एवढे पाणी गुजरातेत वाहून गेले. एवढ्या पाण्याने जिल्ह्यातील गिरणा, हतनूरसह सर्व लहान-मोठे प्रकल्प आठवेळा भरले असते. हे चित्र पाहता आम्ही आमच्या हक्काचे पाणी (Water) केव्हा अडवणार आहोत, असा प्रश्न आता सिंचनाने तहानलेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जळगाव जिल्हातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात गिरणा धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दलघमी एवढी आहे. यंदाच्या पावसाळ्यात गिरणा धरणातून आतापर्यंत एक हजार ११६ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला.
हतनूर धरणातून हजार दहा हजार ९५ दलघमी एवढे पाणी वाहून गेल्याचे आकडेवारी सांगते. या वाहून गेलेल्या पाण्याचा हिशेब केला, तर जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाची साठवण क्षमता ही एक हजार ४२७ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतकी आहे. जिल्ह्यात असलेले गिरणा, हतनूर व वाघूर या मोठे प्रकल्पांसह १३ मध्यम प्रकल्प ९६ लघुप्रकल्प यांची एकूण साठवण क्षमता ही एक हजार ४२७ दलघमी इतकी आहे.
वाहून गेलेल्या पाण्याची आकडेवारी पाहिली, तर तब्बल ११ हजार ७११ दलघमी एवढे पाणी जिल्ह्याबाहेर गेले. म्हणजेच जिल्ह्यात सर्व लहान-मोठे प्रकल्प आठ वेळा भरतील एवढे पाणी वाया गेल्याचे वास्तव आहे.
दर वर्षी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मात्र ते अडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींकडून त्या प्रमाणात हालचाल होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. निधीअभावी अपूर्णस्थितीत असलेल्या प्रकल्पांना निधी देऊन पाणी अडविणे आवश्यक आहे.
- एस. बी. पाटील, समन्वय, शेतकरी कृती समिती, चोपडा (जि. जळगाव)
मोठे प्रकल्प ३
मध्यम प्रकल्प १३
लघु प्रकल्प ९६
गिरणा धरण क्षमता ६०८ (दलघमी)
हतनूर धरण क्षमता ३८८ (दलघमी)
जिल्ह्यातील साठवण क्षमता १४२७ (दलघमी)
वाहून गेलेले पाणी ११७११ (दलघमी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.