‘महाबीज’ बंद होण्याची कर्मचाऱ्यांना सतावतेय भीती

महाबीज’च्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) इतिहासात पहिल्यांदाच व्यवस्थापकीय संचालकपदाचा प्रभार आयएएस ऐवजी विभागीय कृषी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याची नामुष्की ओढवली आहे.
Mahabeej
MahabeejAgrowon

अमरावती : ‘महाबीज’च्या (Mahabeej) (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) इतिहासात पहिल्यांदाच व्यवस्थापकीय संचालकपदाचा प्रभार आयएएस ऐवजी विभागीय कृषी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याची नामुष्की ओढवली आहे. सोबतच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ही सारी खेळी महाबीज बंद (Closer Of Mahabeej) करण्यासाठी खेळली जात असल्याची भीती खुद्द कर्मचाऱ्यांमध्ये आहे. परिणामी, महाबीज कर्मचाऱ्यांमध्ये (Mahabeej Employee) मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Mahabeej
Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

अकोला मुख्यालय असलेल्या महामंडळाकडून राज्याचे मुख्य पीक असलेल्या कपाशी, सोयाबीन तसेच इतर पिकांसाठी हंगामात बियाणे उपलब्ध करून दिले जाते. राज्याची बियाण्यांची मोठी गरज महामंडळाकडून भागविली जाते. महाबीज बाजारात असल्यामुळे खासगी कंपन्यांकडून दर मर्यादित ठेवले जातात. सोबतच महाबीजकडून दर जाहीर झाल्यानंतरच कंपन्या आपले दर जाहीर करतात. यापूर्वी बियाणे उत्पादनासाठी महाबीजला अनेकदा गौरविण्यात देखील आले. परंतु गेल्या काही वर्षांपासून महामंडळाचा कारभार ढेपाळल्यात जमा आहे. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालकपद आयएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे राहते. परंतु साइडपोस्ट म्हणून या पदावर येण्यास कोणीही अधिकारी इच्छुक नाही.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चार अधिकाऱ्यांची संगीत खुर्ची येथे अनुभवण्यात आली. एखादवेळी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नसल्यास स्थानिक जिल्हाधिकाऱ्याकडे संचालक पदाचा प्रभार सोपविण्यात येत होता. आता मात्र महामंडळाचा कारभार स्वीकारण्यास कोणीच तयार नसल्याने हवालदील प्रशासनाकडून जैविक शेती मिशनचे संचालक संतोष आळसे यांच्याकडे नाइलाजाने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जैविक शेती मिशनचे संचालक पद हे विभागीय कृषी सहसंचालक दर्जाचे आहे. त्यामुळे आयएएस अधिकारी मिळाला नाही म्हणून कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे महत्त्वाच्या महामंडळाची जबाबदारी सोपविणे योग्य आहे का, असा सवाल या पार्श्‍वभूमीवर उपस्थित केला जात आहे.

Mahabeej
Tur Rate : तुरीचे दर कितीने नरमले ?

इतकेच नाही तर महामंडळात बियाणे उत्पादन, प्रक्रिया, विपणन, प्रशासन अशी महत्त्वाची सर्वच पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असताना ती भरण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू नाहीत. या साऱ्या घडामोडींमुळे महाबीज बंद करण्याचा सरकारचा विचार तर नाही, अशी भीती महाबीज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

यंदा केवळ ४८ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे विक्री

महबीजकडून दरवर्षी हंगामात साडेचार लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात मात्र अवघे पन्नास हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उत्पादन करण्यात आले. त्यापैकी ४८ हजार क्विंटलपेक्षा कमी बियाणे विकता आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही परिस्थिती महाबीजवर का? आणि कोणामुळे ओढवली यावरही खरमरीत चर्चा रंगली आहे.

बियाणे बाजारात महाबीजचे अस्तित्व असल्यामुळेच बियाणे बाजारावर दबाव राहतो असा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रकारची शेतकरी हिताची यंत्रणा बंद करण्याचा विचार सरकार कधीच करणार नाही. याउलट महाबीजचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न राहील. त्याकरिता लवकरच महाबीजचा आढावा घेणार आहे.

- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री

शेतकऱ्यांशी निगडित एका संस्थेसाठी प्रशासकीय अधिकारी मिळत नसेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, गरज पडली तर या पदावर प्रशासकीय अधिकारी मिळत नाही म्हणून आम्ही शेतकऱ्याला या खुर्चीवर बसवू.

- बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com