
Parbhani News पर्यावरणीय बदल व पर्यावरणाचे होत असलेले प्रदूषण (Pollution) मोठ्या प्रमाणात होत असून याबाबत जनजागृती करून पर्यावरणाचे (Environment) वाढते प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी राज्यसभा सदस्या खासदार डॉ. फौजिया खान यांच्या पुढाकारातुन कॉस्मोपोलीटन एज्युकेशनल अॅन्ड वेल्फेअर सोसायटी परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यात पर्यावरण रक्षक मोहिम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गंत बुधवारी (ता. १९) जिल्ह्यातील शालेय शिक्षकांची कार्यशाळा कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे होते तर उद्घाटक म्हणून खासदार डॉ. फौजिया खान या होत्या. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माजी वन अधिकारीतहसीन अहमद खान, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपविभागीय अधिकारी एस. आर. कुलकर्णी, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की अन्न सुरक्षा, जल सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेचे आव्हान आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे.
अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बदलत्या हवामानास अनुकूल कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून विकसित केले जात आहे.
पर्यावरणातील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सर्वांची असून पर्यावरण सुरक्षित परभणी मोहिमेत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी या मोहिमेत मोठे योगदान देऊ शकतात.
फौजिया खान म्हणाल्या, की परभणी जिल्ह्यात धुळीमुळे होत असलेले, तसेच पाण्याचे होत असलेले प्रदूषण अत्यंत घातक आहे. या मोहिमेत शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा. या मोहिमेचे मूल्यांकन केले जाईल व त्यातून चांगल्या शिक्षकांचा गौरव करण्यात येतील, असे जाहीर केले.
या मोहिमेमुळे परभणी जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल अशी आशा व्यक्त केल्या जात आहेत. परभणी जिल्ह्यात पर्यावरणरक्षम ही मोहीम जून ते डिसेंबर कालावधीत राबविण्यात येणार असून मोहिमेत शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.