
Crop Damage Compensation जालना : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी २७ ऑक्टोबर २०२२ रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या पिकांची पाहणी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे केली होती. १५ दिवसांत पंचनामे (Crop Damage Survey) करून मदत देणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले होते.
मात्र, ४ महिने उलटूनही शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत मिळालेली नाही, त्याची आठवण कृषिमंत्री यांना निवेदनातून करून दिल्याचे बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, राहुल साबळे यांनी करून दिली आहे.
थेट मंत्रालय गाठून कृषिमंत्र्यांना निवेदन देऊन मदतीचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लवकरच शेतकऱ्यांना नुकसानीची मदत, विम्याचा लाभ मिळवून देणार असल्याचे या वेळी सांगितल्याचे श्री. लोखंडे यांनी कळविले आहे.
कापूस, सोयाबीनला दर नसल्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकरी खूप संकटात सापडला आहे. पीकविमा, अतिवृष्टीची मदत अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली आहे. त्यामुळे आपण सभागृहात आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, राहुल साबळे यांनी केली आहे.
यासंदर्भात विधानभवन मुंबई येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जयंत पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष दानवे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदींकडे निवेदन दिले आहे. पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही.
खरीप हंगाम संपला, रब्बी हंगाम संपला तरीही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. वीजबिल वसुलीच्या नावाखाली महावितरण शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे.
कापूस, सोयाबीन, कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्याला मदतीचा आधार सरकारने देण्याची मागणीही करण्यात आल्याचे श्री. लोखंडे यांनी कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.