Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh Koshyari Agrowon

राज्यपालांच्या हस्ते कृषी रत्न पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार

राज्यातील कृषी, फलोत्‍पादन (Horticulture) आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नाशिक येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सोमवारी (ता. २) गौरविण्यात आले.

नाशिक : बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला असता किंवा मग कृषी खात्याच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे पसंत करेन, असे पवार म्हणाले आहेत.

राज्यातील कृषी, फलोत्‍पादन (Horticulture) आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन-उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांतील १९८ शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात सोमवारी (ता. २) पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) दुरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

राजेंद्र पवार या सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार न स्वीकारण्याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ``आजवर मी शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे. शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फुले दाम्पत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मते मांडली जात आहेत. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक अराजकता निर्माण करत आहेत. त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी मुख्यंंमंत्र्यांच्या हस्ते किंवा अगदी एखाद्या कृषी कार्यालयात जाऊन हा पुरस्कार मी स्वीकारला असता. ``

दरम्यान, पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शेतीचा विकास करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची गरज व्यक्त केली. राज्यपाल म्हणाले की, आपल्या देशाची कृषिप्रधान म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेमुळे अन्न धान्यात देश स्वयंपूर्ण (Aatmnirbhar) होऊन परदेशात निर्यात करत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान येथे झाला. त्यांनी आता आपले ज्ञान इतरांना देऊन प्रोत्साहन द्यावे. शेतीचा विकास (Agriculture Development) करताना सर्वांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे.

कोश्यारी म्हणाले, हा देश सीमेवरील जवान व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांप्रति सदैव ऋणी आहे. शेतमालाला भौगोलिक चिन्हांकन मिळाल्यामुळे त्यास अधिक मागणी असून अधिक दर मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. येथील कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांना समस्यांना उत्तर देण्यासाठी व्हायला हवे. त्यातून शेतीविकास वाढला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पीककर्जास शून्य टक्के व्याज, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अजूनही दोन लाखांवर कर्ज माफीबाबत मागणी होत आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक स्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. पुढे परिस्थिती सुधारल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊ. वेळेत पीककर्जाची परतफेड करा, मात्र आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे.

पुरस्कारार्थींमध्ये ‘शेतीमित्र पुरस्कार’ ॲग्रोवनचे कोल्हापूर प्रतिनिधी राजकुमार चौगुले व अकोला प्रतिनिधी गोपाल हागे यांना तर ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ नागपूर प्रतिनिधी विनोद इंगोले यांना यावेळी प्रदान करण्यात आला.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. मंत्री थोरात यांनी मनोगत व्यक्त करत माझ्या आयुष्यातील ६ वर्षांचा कृषिमंत्री हा कार्यकाळ संस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुनंदा सलोटकार यांचे मनोगत झाले. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आभार मानले. नंदेश उमप यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

आता कृषी पुरस्काराची रक्कम पाचपट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा गौरव करताना म्हणाले, कोरोना सारख्या संकटात अन्न दात्यांनी हा देश सांभाळला, शेतकरी हे देशाचे खरे वैभव आहे. त्यांच्या कष्टाचे व प्रयोगशीलतेने मोल होऊच होऊ शकत नाही. पुरस्काराची रक्कम कमी असली तरी कौतुक मोठे आहे. या पुरस्काराची रक्कम वाढविणार असे भाषणात नमूद केले. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलताना पुरस्काराची रक्कम पाचपटीने वाढविण्याची यावेळी घोषणा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com