Orange Demand:पावसामुळं मोसंबीच्या मागणीत घट

यंदा सततच्या पावसामुळे बागांना ताण बसला नाही. त्यामुळेही उत्पादनावर परिणाम झालाय. बागांवर बुरशीजन्य रोगाचांही प्रादुर्भाव वाढलाय.
Orange
OrangeAgrowon

आंबिया बहरातील मोसंबीची काढणी सध्या सुरु आहे. पण पावसामुळे मोसंबीला मागणी कमी आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये (APMC) मोसंबीला गुणवत्तेप्रमाणं प्रति क्विंटल १००० ते ३००० रुपये दर मिळतोय. यंदा सततच्या पावसामुळे बागांना ताण बसला नाही. त्यामुळेही उत्पादनावर परिणाम झालाय. बागांवर बुरशीजन्य रोगाचांही प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे फळगळ होतेय. पावसामुळं झाडांवरील फळं जास्त दिवस टिकतील, असं वाटत नाही. म्हणजेच पुढील काळात कमी माल उपलब्ध असेल. त्यामुळे मोसंबीच्या दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

श्रावणातही पोल्ट्री दरात सुधारणा

मका आणि सोयापेंडचे दर वाढल्याने पोल्ट्रीचा उत्पादन खर्च वाढलाय. सध्या किलोमागे ९० रुपयांपर्यंत पोल्ट्रीचा उत्पादनखर्च पोहोचलाय. त्या तुलनेत शेतकऱ्यांना परतावा कमी मिळतोय. पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मिळणारा दर म्हणजेच जिवंत पक्ष्यांचा दर ६० ते ६५ रुपये प्रति किलो होता. सध्या श्रावणामुळे राज्यात चिकनला मागणी घटलीय. त्यामुळे दर आणखी दबावाखाली येण्याची शक्यता होती.

मात्र हरियाणा आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून मागणी वाढलीय. त्यामुळे स्थानिक मागणी कमी असूनही जिवंत पक्ष्यांचा दर ८० ते ८५ रुपयांवर पोचलाय. मात्र तरीही हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहे. पण श्रावण महिना संपल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असे पोल्ट्री व्यापाऱ्यांनी सांगितले.

मिरचीचे दर टिकून राहण्याचा अंदाज

जूनमध्ये लागवड झालेली मिरची जुलैमधल्या पावसात सापडली. पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मिरचीचा पुरवठा घटण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये मिरचीच्या दरात क्विंटलमागं ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालीय. सध्या राज्यात मिरचीला सरासरी ३००० ते ४५०० रुपये दर मिळतोय. कोल्हापूर बाजारात सर्वाधिक ६६०० रुपयांचा दर मिळाला. मागील तीन दिवसांपासून मिरची उत्पादक पट्ट्यात पाऊस होतोय. पुरवठा आक्रसण्याची शक्यता असल्याने दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

सोयाबीनचे दर २०० रुपयांनी सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) , सोयातेल आणि सायापेंडच्या दरात बुधवारी सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे जवळपास दीड टक्क्याने सुधारले. सोयापेंडचे दरही दोन टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम देशातील सोयाबीन दरावरही पाहायला मिळाला. बुधवारी देशात सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली.

लातूर बाजारात दर १५० रुपयांनी सुधारून ६३७० रुपयांवर पोहोचले. मध्य प्रदेशातील इंदूर बाजारात ६२०० रुपये भाव मिळाला. तर एनसीडीईएक्सच्या नागपूर केंद्रावर सोयाबीन दर २ टक्के वाढून ६७०० रुपयांवर गेले. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचं चित्र पाहता सोयाबीनचे दर काही काळ तरी सध्याच्या पातळीवर स्थिर राहतील, असं जाणकारांनी सांगितलं.

कापसाला यंदा किती भाव मिळणार?

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कापूस उत्पादक (Cotton Producer) शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत. जगात सगळ्यात जास्त कापूस लागवड भारतात केली जाते. गेल्या वर्षी विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा देशातील कापूस पेरा वाढलाय. देशात यंदा कापूस लागवड १० टक्क्यांनी वाढून १३५ लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर अमेरिकेत जवळपास ४२ लाख, चीनमध्ये ३३ लाख, तर पाकिस्तानात २५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा अंदाज आहे.

पाकिस्तानात यंदा १२५ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. एक कापूस गाठ १७० किलोची असते. पण हा कापूस पाकिस्तानची गरज पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळं पाकिस्तानला यंदाही आयात करावी लागेल. तर चीनमध्ये ३५० लाख गाठींचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत सुरूवातीला २२० ते २२५ लाख गाठींच्या दरम्यान कापूस उत्पादनाचा राहण्याचा अंदाज होता. पण, टेक्सास व इतर कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळ, पाणी टंचाई, प्रतिकूल हवामान यामुळे पिकाला फटका बसला.

त्यामुळे यंदा अमेरिकेत कापसाचं उत्पादन २० टक्क्यानं घटण्याची शक्यता आहे.तर भारतात यंदा ४०० लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. परंतु गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणातील पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलाय. तर महाराष्ट्रात विदर्भ, खानदेशात पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे यंदा देशात कापसाचं क्षेत्र वाढलेलं असलं तरी उत्पादन अपेक्षेइतकं वाढण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजेच यंदाही जागतिक बाजारात कापसाची टंचाई जाणवू शकते.

या परिस्थितीत देशातून कापसाची निर्यात वाढेल. त्यामुळे यंदाही कापसाला चांगला दर मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं. कापसाची कमीत कमी भावपातळी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयादरम्यान राहू शकते. त्यामुळे त्यापेक्षा कमी दर मिळाल्यास कापूस विक्री करू नये, असा सल्ला जाणकारांन दिलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com