
Kisan Morcha Update : राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यासांठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी पायी (Farmer March) चालणार आहेत.
शेतकऱ्यांचा हा पायी मोर्चा राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या लोणी येथील कार्यालयावर शेतकरी मोर्चा धडकणार आहे.
या मोर्चामध्ये किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारो शेतकऱ्यांसह पायी चालणार आहेत. शेतकऱ्यांचा पायी मोर्चा २६ एप्रिलला अकोले येथून निघणार असून २८ एप्रिलला लोणी येथे पोहोचणार आहे.
हजारो शेतकरी तीन दिवस पायी चालत मंत्री विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडक देतील, अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
या मोर्चात प्रामुख्याने वन जमिनी, देवस्थान जमिनी व इनाम वर्ग ३ च्या जमिनी नावे करण्याचा मुद्दा घेण्यात आला आहे. तसेच दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली होते. या समितीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्ष होते. ही समिती गुंडाळण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचे धोरण सरकार आखत आहे. या विरोधातही मोर्चामध्ये आवाज उठवला जाणार आहे. याशिवाय शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न तसेच कापूस, सोयाबीनचे पडलेले भाव यासह इतर प्रश्न अशा १८ मागण्यांचा समावेश या मोर्चात करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास अस्मानीच्या संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणीही किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.