Farmer Protest : खंडित वीजप्रश्‍नी शेतकऱ्यांचा ‘ठिय्या’

नियमित आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बल्हेगाव, गणेशपूर सुकी, वडगाव या तीन गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन केले.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

येवला, जि. नाशिक : पिकांना भाव नाहीत, पण पिके जोमात असून पुरेशा प्रमाणात पाणीही उपलब्ध आहे; मात्र सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे (Power Supply) पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे नियमित आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर (Mahavitaran Office) बल्हेगाव, गणेशपूर सुकी, वडगाव या तीन गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन (Farmer Protest) केले.

दीड तासानंतर सुरळीत वीजपुरवठ्याचे आश्‍वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

शासनाने शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा देण्याचे जाहीर केले आहे; मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सलग दोन-तीन तासही वीजपुरवठा मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले.

सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान होत आहेच; परंतु विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असून, या भागात मोठ्या प्रमाणात पैठणीचे हातमाग असल्याने पैठणी विणकामसुद्धा करणे मुश्कील झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी या वेळी केल्या. संतप्त शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे व प्रश्‍नांची सरबत्ती झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी आंदोलनात मध्यस्थी करत संबंधितांना सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्या.

उपकार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांना निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Farmer Protest
Mahavitran Strike : राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा

नाना पिंगळे, दत्ता जमधडे, विलास पिंगळे, दत्तात्रय वाणी, सचिन जाधव, अरुण कापसे, समाधान सोमासे, ज्ञानेश्‍वर जमधडे, राजेश निकाळे, अरुण लकारे, नीलेश मलिक, बाबासाहेब जाधव, विजय कापसे, समाधान कांडेकर, दत्तात्रय जाधव, अशोक जमधडे, विजय कापसे, राकेश जमधडे, अण्णा जाधव, समाधान कांडेकर, जनार्दन जमधडे, संतोष सोमासे, मनोज पिंगळे, शिवाजी कापसे, दत्तात्रय जाधव आदी आंदोलनात सहभागी झाले.

‘आम्ही वीजबिले नियमित भरतो. त्यामुळे किमान आठ तास तरी नियमित वीज मिळाली पाहिजे; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. याप्रश्‍नी आम्ही आठ ते दहा वेळेस महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करूनही न्याय मिळाला नाही. म्हणून आंदोलनाची भूमिका घेतली. एक तर शेतीमालाला भाव नाही. त्यात वीज नसेल, तर पिके कशी जगतील हा प्रश्‍न असल्याने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करावा. अन्यथा यापुढे विंचूर चौफुलीवर आंदोलन करू.
नानासाहेब पिंगळे, शेतकरी, बलेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com