
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेला कापूस (Cotton) अखेरीस आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला.
परिणामी बाजारात ६० टक्के कापूस आल्याचा दावा केला जात असून केवळ ४० टक्केच कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे शिल्लक उरला आहे.
अशा स्थितीत येत्या काळात बाजार (Cotton Market) दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर आठ हजारांचा पल्ला गाठतील, अशी माहिती पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी दिली.
गेल्यावर्षीच्या हंगामात वर्धा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाने उच्चांकी दराचा पल्ला गाठला होता. या भागात कापसाचे दर ११ हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवड क्षेत्रात वाढ केली.
मात्र जागतिकस्तरावर कापसाच्या दरात झालेली पडझड त्यासोबतच भारत सरकारने कापसाची केलेली आयात याच्या परिणामी कापसाचे दर दबावात आले.
सध्या ७६०० रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचे व्यवहार होत आहेत. यातून कापसाच्या उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होणार नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा होती.
याच अपेक्षेतून शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली. बाजारात कापूस येत नसल्यामुळे प्रक्रिया उद्योगांची अडचण झाली.
अनेक प्रक्रिया उद्योग कमी क्षमतेने तर काही बंदच राहिले. आता शेतकऱ्यांचा सयंम सुटत असून कुटुंबाची आर्थिक निकड त्यासोबतच नव्या हंगामाची तयारी याकरिता लागणाऱ्या पैशाची सोय म्हणून त्यांच्याद्वारे कापूस विक्रीसाठी काढता जात आहे.
वैराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरी ४२ लाख हेक्टर कापसाखालील क्षेत्र आहे. हंगामात पावसाची संततधार, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, बोंडसड अशा अनेक कारणांमुळे उत्पादकता प्रभावीत झाली.
त्यानुसार यंदाच्या हंगामात ४०० लाख क्विंटल (८० लाख गाठी) कापसाचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजांच्या पूर्ततेकरिता सद्यःस्थितीत २४५ ते २५० लाख क्विंटल (४५ लाख गाठी) कापूस बाजारात आणला आहे.
६० टक्के कापूस याप्रमाणे बाजारात दाखल झाल्याने कापसाचा केवळ ४० टक्के म्हणजेच १४५ ते १५० लाख क्विंटलचाच साठा उरला आहे. परिणामी येत्या काळात कापूस बाजारात सुधारणाचे संकेत मिळत आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरात अपेक्षित सुधारणा होत ते आठ हजार रुपयांपेक्षा अधिकचा पल्ला गाठतील, अशी शक्यता आहे.
जागतिकस्तरावरील कापूस बाजारातील मंदिचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला. परिणामी यंदा दर दबावात राहिले.
शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसापैकी ६० टक्के बाजारात आला आहे. उर्वरित ४० टक्केच साठा असून बाजारात यापुढील काळात सुधारणांची शक्यता आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर ८ रुपयांपेक्षा अधिक राहतील.
- गोविंद वैराळै, कापूस विषयाचे अभ्यासक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.