
कोल्हापूर : महापूर, कोरोनानंतर अनेक उद्योग व्यवसाय सावरले पण पॉलिहाउसमधील (Polyhouse) फुलांची मागणी (Flower Demand) फारशी वाढली नसल्याने जिल्ह्यातील पॉलिहाउसचा बाज हरवला आहे. बहुतांशी शेतकरी पॉलिहाउस काढून अन्य पिकांकडे वळले आहेत.
अगदी मातब्बर शेतकऱ्यांनी ही पीक बदलाचा मार्ग स्वीकारला आहे. २०१९ पासून सातत्याने पॉलिहाउसच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
ज्या पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना शेतीपिक नुकसानभरपाई किंवा कर्जमाफीत समावेश नसल्याने भरपाई मिळत नाही, निर्यात फारशी नसल्याने पॉलिहाउस व्यवसाय वाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२०० हून अधिक पॉलिहाउसपैकी सध्या जेमतेम ३५० वर नोंदणीकृत पॉलिहाउस शिल्लक आहेत.
२००० ते २००५ या कालावधीत जिल्ह्यात पॉलिहाउसची संख्या १२०० च्या आसपास होती. छोट्या शेतकऱ्यांबरोबर मोठे उद्योग समूह या व्यवसायात उतरल्याने फूल, फळे आदींची वर्षाला कोट्यवधी रुपयांची निर्यात होत होती. जसा कोरोना आला तसे पॉलिहाउसधारकांचे धाबे दणाणले. ठप्प झालेली फुलाची मागणी अपवाद वगळता अजूनही पूर्वपदास येण्यास तयार नसल्याने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
संकटांची मालिकाच
रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. अतिवृष्टी, वादळ यामुळे नुकसान झाले. महापूरकाळात पॉलिहाउसमध्ये काम करणारे मजूर वेळेत कामाला येऊ शकले नाहीत. या काळात लागवड केलेल्या रोपांची वाढ, फुलधारणेचे नियोजन बिघडले. उत्पादन घटले, दोन वर्षांचे फुलांची मागणी कमी झाली पण खर्च सुरू असल्याने आर्थिक बोजा पडत आहे.
यात अनेकांना पॉलिहाउसची कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. परिणामी, पॉलिहाउस नुकसानीत गेले. शेतीपीक कर्जमाफी, नुकसान भरपाईची शासकीय योजनाचा लाभ पॉलिहाउससाठी लागू झाला नाही. शासनस्तरावरून नुकसान भरपाई मिळत नाही. परिणामी पॉलिहाउसची शेती संकटात आली आहे.
कोट्यवधींचे नुकसान
जिल्ह्यात सर्वात मोठ्या पॉलिहाउसमध्ये गणना होत असणाऱ्या दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील श्रीवर्धन बायोटेकचे एकाच जागी शंभर एकरांहून अधिक क्षेत्रावर पॉलिहाउसचे क्षेत्र होते. पण संकटाची मालिका सुरू झाल्याने केवळ २० एकर क्षेत्रावर सध्या पॉलिहाउसमधील पीक, फुलांचे उत्पादन सुरू आहे. अन्य क्षेत्रावर ऊस व फळबाग लागवडीकडे त्यांचा कल आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने पॉलिहाउस शेती कमी करावी लागल्याचे व्यवस्थापक रमेश पाटील यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.