
नाशिक : आशिया खंडात एक नंबर बाजार समिती असा नाव लौकिक प्राप्त असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) शेतकऱ्यांसाठीच्या सोई-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून तातडीने सुविधा पुरवाव्यात, अन्यथा शिवसेनेतर्फे (Shivsena) आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सतीश खरे यांना निवेदन दिले.
सध्या खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे लिलाव वेळेवर होण्यासाठी शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर रात्री मुक्कामी यावे लागते. रात्रीच्या वेळी एकही सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही नसल्यामुळे वारंवार शेतीमाल व वाहनांचे भाग चोरी होण्याच्या घटना घडत आहेत.
सोईंच्या अभावामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी रात्री प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत गैरसोयीसंदर्भात पाहणी केली. याबाबत सचिव नरेंद्र वाढवणे यांच्याशी संपर्क साधत सोई-सुविधा पुरविण्याची मागणी केली. या वेळी पाटील यांनी बाजार आवारात भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
कोटमगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवाराच भोजनाची सोय नाही. दिवे नाहीत. थंडी असून झोपण्यासाठी निवारा नाही, वाहनांच्या आश्रयाला झोपावे लागते. शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. डासांमुळे शेतकरी, व्यापाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन
प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन आठ दिवसांत शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, बाळासाहेब होळकर, कांदा व्यापारी प्रवीण कदम, केशवराव जाधव, संदीप पवार, बापूसाहेब मोकाटे, संतोष वैद्य, शिवाजी गोरे, समाधान पगार, दत्तू आहेर, दिनकर गोरे, जालिंदर गोजरे, गोरख गोरे आदींनी निवेदनात दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.