
रिसोड, जि. वाशीम ः ‘‘पीकविमा कंपनी (Crop Insurance) व शासनाचे वेळकाढू धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेच्या लपंडावात मशगूल सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही.
शासन विमा कंपनीला (Crop Insurance Company) पाठीशी घालत आहे. शेतकऱ्याला भीक नको तर त्याला हक्काचे दाम मिळायला हवेत,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केले.
पीकविमा कंपनी व शासनाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत गुरुवारी (ता. १९) येथे पीकविमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुपकर उपस्थित होते. या वेळी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील- मोरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
तुपकर म्हणाले, ‘‘वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळाली. एआयसी विमा कंपनीने फसवले आहे. हजारो शेतकरी आजही मदतीविना अपेक्षेने फिरत आहेत. भरलेल्या प्रीमियमपेक्षाही काहींना कमी मदत मिळाली. कृषी सहायकाला विश्वासात न घेता कंपनीने पंचनामे केले.’’
‘...अन्यथा राज्यभरात आंदोलन’
शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत पीकविम्याची रक्कम न मिळाल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी ‘स्वाभिमानी’ने दिला. मोर्चाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी आणल्या होत्या. ही कागदपत्रे तहसीलदारांकडे सुपूर्द करीत त्यांना तातडीने निकाली काढण्याची सूचनाही करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.