केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावामुळे शेतकऱ्यांची निराशा

केंद्र सरकारकडून घसघशीत वाढ केल्याचा दावा केला जात असताना, हमीभाव वाढीतून निराशा झाली आहे. केंद्र सरकारने डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावामुळे शेतकऱ्यांची निराशा
MSPAgrowon

यवतमाळ : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२२-२३ चे हमीभाव (MSP) जाहीर केले. सोयाबीनला ३५० रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यांसाठी ३५५ रुपये आणि मध्यम धाग्यांसाठी ३५४ रुपये वाढविण्यात आले. केंद्र सरकारकडून घसघशीत वाढ केल्याचा दावा केला जात असताना, हमीभाव वाढीतून निराशा झाली आहे. केंद्र सरकारने डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन व कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. हमीभाव वाढीत १४ पिकांचा समावेश आहे. २०२१-२२ च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये वाढ केली होती. मात्र यंदा ३५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सोयाबीनचा हमीभाव ३,९५० रुपयांवरून ४,३०० रुपये झाला आहे. तर मध्यम धागा कापसाच्या भावात ३५४ रुपयांची वाढ झाल्याने हमीभाव ६,०८० रुपये मिळणार आहे. लांब धाग्याच्या कापसासाठी ३५५ रुपये वाढ करून ६,३८० हमीभाव जाहीर करण्यात आला.

स्वामिनाथन आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन व कपाशी ही दोन प्रमुख पिके खरीप हंगामात घेतली जातात. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, औषधे, डिझेल, नांगरणी, वखरणी, मजुरीच्या खर्चातही वाढ झाली. एकरी होणारा खर्च व त्यातून निघणारे उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसताना दिसत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. मात्र विरोधी पक्षातील नेतेमंडळी केवळ राजकारणात मश्गूल आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी काही देणे, घेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

केंद्र सरकार व राज्यातील नेते राजकारणात मश्गूल आहेत. निराशाजनक हमीभाव असताना विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यात रस दाखविला नाही. एकरी लागवडखर्चात वाढ होत आहे. बियाणे, खते, औषधांच्या किमतीत वाढ झाली. हमीभाव वाढीचा निषेध आहे.

- मनीष जाधव, शेतकरी, वागद, महागाव

यंदा खासगीत कापसाला १५ हजारांपर्यंत, तर सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाववाढ मिळाली. बियाणे, खते, औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. हमीभाव जाहीर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हातात चॉकलेट दिले. शेतीत वाढणारा खर्च लक्षात घेता कापसाला कमीत कमी दहा हजार व सोयाबीनला साडेआठ ते नऊ हजार रुपये हमीभाव मिळायला पाहिजे.

अनुप चव्हाण, शेतकरी, बोथबोडन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com