
Agriculture News खर्डी ः यंत्राद्वारे शेती (Agriculture Mechanization) करण्याच्या पद्धतीला आता शेतकरी सरावले आहेत. पण, ही पद्धत देखील शेतकऱ्यांना अधिक खर्चात टाकणारी ठरू लागली आहे. याचे कारण आहे डिझेलचे वाढते दर (Diesel Rate). त्यातच पारंपरिक साधन असणारी बैलजोडीची किंमतही लाखोंच्या घरात पोहोचली आहे.
तर मजुरीचे दरही वाढल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीतून निघणारे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे शेतकरी नाडला जात आहे. त्यामुळे शेतकरी इतर पिकांच्या पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसत आहे.
पूर्वी बैलांच्या माध्यमातून शेती केली जात होती. त्यात बदल होऊन वेळेची बचत होते म्हणून ट्रॅक्टरद्वारे शेती कसली जाऊ लागली. मात्र, यंत्राद्वारे शेती करताना इंधनांचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतूनाशके औषधे, खते आदींच्या किमती शेती व्यवसायाला परवडण्यासारख्या नाहीत.
तसेच वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कांदा, लसूण, मोगरा, आंबा, भेंडी, कलिंगड, शेवगा, कारले यांसारख्या पिकांची लागवड करण्याकडे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहेत.
या पिकांसाठी मेहनत व खर्च कमी असून जास्त आर्थिक फायदा होत असल्याचे खर्डी परिसरात हळदीचे उत्पन्न घेणाऱ्या रामनाथ उबरगोंडे यांनी सांगितले. दरम्यान, काही मोजके शेतकरी घरात खाण्यासाठी आपल्या शेतातील तांदूळ असावा यासाठी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करत आहेत.
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंबा,काजू,चिकू,नारळ व मोगरा यासारखी पिके घेतल्यास कमी खर्च व मेहनत करून जास्त आर्थिक फायदा मिळतो. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी फळ व फुल झाडांची लागवड करावी.
- गोकुळ अहिरे, कृषी सहायक, खर्डी
बेमोसमी पावसामुळे भातपिकासारखी शेती मेहनत व खर्च करूनही वाया जात आहे. त्यामुळे आता भात पिकासारखी शेती करणे मुश्किल झाले आहे.
- तुकाराम घोडंविंदे, शेतकरी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.