
अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात यंदा रब्बी हंगामात (Rabbi Season) सूर्यफूल पिकाची ३५० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
अन्य पिकांच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च आणि अधिक उत्पादकता आदी कारणांमुळे शेतकरी परत सूर्यफुलाकडे वळत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वसमत तालुक्यातील सूर्यफुलाच्या क्षेत्रात (Sunflower Area) वाढ झाली आहे.
खरीप, रब्बी तसेच उन्हाळी असे तीनही हंगामातील गळीत धान्य पीक म्हणून सूर्यफुलाची ओळख आहे. पूर्वी जिल्ह्यामधील शेतकरी तीनही हंगामांत सूर्यफूल या नगदी पिकाचे उत्पादन घेत असत.
परंतु विविध कारणांनी उत्पादकता कमी झाली. हे पीक परवडत नसल्यामुळे जिल्ह्यातील सूर्यफुलाच्या क्षेत्रात मोठी घट झाली. अनेक तालुक्यात हे पीक नामशेष झाले.
परंतु वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, अंबा आदी महसूल मंडलांतील शेतकरी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने रब्बी सूर्यफुलाचे कमी अधिक क्षेत्रावर उत्पादन घेत आहेत.
इतर रब्बी पिकांच्या तुलनेत सूर्यफुलासाठी कमी उत्पादन खर्च लागत आहे. उत्पादनही चांगले मिळत आहे. विक्रीसाठी वसमत येथे जवळचे मार्केट आहे. दरही बऱ्यापैकी मिळत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल परत सूर्यफुलाकडे वाढल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या सुमारे १०० हेक्टरच्या तुलनेत यंदा ३५० हेक्टरवर सूर्यफुलाचा पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील करडई पैदासकार डॉ. श्यामराव घुगे म्हणाले, ‘‘पक्षाचा त्रास तसेच उत्पादकता घटल्यामुळे सूर्यफुलाच्या क्षेत्रात मोठी घट झाली. परंतु यंदाच्या रब्बीत अनेक शेतकरी सूर्यफूल तसेच करडईकडे वळल्याने क्षेत्र वाढले आहे. तेल उत्पादन वाढीसाठी मदत होईल.’’
मर रोगामुळे हरभऱ्याची उत्पादकता कमी झाली आहे. पाऊस लाबंल्याने पेरणीस उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातील सूर्यफुलाचे क्षेत्र वाढले आहे.
- गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी,
वसमत, जि. हिंगोली
आठ वर्षांपासून रब्बीत तीन एकरांवर सूर्यफुलाचे उत्पादन घेत आहोत. हरभऱ्याच्या तुलनेत माफक खर्चात किफायतशीर उत्पादन मिळत आहे.
- राम खराटे, शेतकरी, कवठा,
ता. वसमत, जि. हिंगोली
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.