Rajma Cultivation : रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी निवडला राजमाचा पर्याय

रब्बी हंगामात पारंपरिक हरभरा पिकात मर वाढल्याने पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी राजमा पिकाला पसंती दिली आहे.
Rajma Cultivation
Rajma CultivationAgrowon

उस्मानाबाद : रब्बी हंगामात पारंपरिक हरभरा (Chana) पिकात मर वाढल्याने पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी राजमा (Rajma Cultivation) पिकाला पसंती दिली आहे. गतवर्षीच्या हंगामात लातूर कृषी विभागातील हिंगोली वगळता चार जिल्ह्यांत असलेले राजमा (Rajma Acreage) पिकाचे क्षेत्र यंदा जवळपास चारपट वाढले आहे.

Rajma Cultivation
Rajma Cultivation : रब्बीत राजमा लागवडीकडे कल

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत रब्बी हंगामात हरभरा प्रमुख पीक असते. अलीकडे या पिकामध्ये मरीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी इतर पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत यंदा करडई पिकाची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली.

तसेच आता लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा या उत्तर भारतातील पिकालाही मोठी पसंती दिली आहे. गतवर्षी या चार जिल्ह्यांत राजमाचे एकूण क्षेत्र २०८९ हेक्टर होते. यंदा तो आकडा ८२०५ हेक्टरवर पोहोचला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, कळंब, उस्मानाबाद, भूम, लातूर जिल्ह्यातील औसा, रेणापूर, लातूर, नांदेड जिल्ह्यातील देगलूर आदी तालुक्यांत राजमा पीक वाढले आहे. याशिवाय उत्पादित राजमाच्या खरेदीसाठी सातारा व दिल्ली येथील व्यापारी थेट वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Rajma Cultivation
Rajma Cultivation : परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बीत राजमाकडे कल

उडीद, मूग, सोयाबीननंतर पेरणी

खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी पिकाच्या काढणीनंतर शेतकरी राजमाची पेरणी करतात. साधारणतः एकरी २५ ते ३० किलो बियाण्यांचा वापर केला जातो. मावा, तुडतुडे, बुरशीचा प्रादुर्भाव वगळता फारशी कीड या पिकावर येत नाही. साधारणतः अडीच महिन्यात पीक निघून जाते. प्रतिक्विंटलला ५००० च्या पुढेच आजवर दर मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

दोन-तीन एकरांपासून सुरू करून आता पाच वर्षांनंतर ३५ ते ४० एकरांवर राजमा पेरतो. याशिवाय अनुभवातून नव्याने पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतो. दिल्ली, सातारा आधी ठिकाणचे व्यापारी सारोळा मांडवा येथे खरेदीसाठी येतात. सध्या प्रत्येक क्विंटलला सात हजारांचा दर आहे.

- श्रीराम मोरे, राजमा उत्पादक सारोळा मांडवा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद

हरभरा पिकात मर वाढल्याने पर्याय म्हणून शेंगावर्गीय राजमा पिकाचा पर्याय कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाने शेतकऱ्यांना सुचविला. गेल्या वर्षी शून्य क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता जवळपास २५० हेक्टरवर राजमा आहे. फारशी कीड, रोग या पिकावर येत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला आपलेसे केले आहे.

- डॉ. देविकांत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके पोकर्णी, जि. नांदेड

गतवर्षीच्या तुलनेत राजमा पिकाचे क्षेत्र जवळपास चारपट वाढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व कळंब तालुक्यांत क्षेत्र सर्वाधिक आहे. लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतही शेतकऱ्यांनी राजमाला पसंती दिली आहे.

- साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com