
कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास (Dhamni & Kadvas Dam) या दोन धरणांतून उजव्या व डाव्या कालव्याने अनेक गावांना पाणीपुरवठा (Water Supply) केला जातो. या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भात शेती (Paddy Farming) केली जाते, पण नुसत्या भात शेतीवर अवलंबून न राहता ग्रामीण भागात अनेक शेतकरी आता भाजीपाला लागवडीकडे (Vegetable Cultivation) वळले आहेत.
लवकर उत्पन्न देणाऱ्या पालेभाज्या, फलभाज्या लागवडीकडे येथील अनेक शेतकरी वळू लागले आहेत. कारण भात शेतीची लागवड केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी उत्पन्न हाती येते. तसेच यातून आर्थिक लाभही खूप कमी असतो. यामुळे सध्या ७० टक्के शेतकरी भात शेतीबरोबरच फळ आणि भाजीपाला लागवड करत आहेत.
यासाठी नाशिक आणि इतर भागांतून विविध अद्ययावत नर्सरीद्वारे टोमॅटो, वांगी, मिरची, कारले, कोबी, फ्लॉवर, शेवगा, पपई, टरबूज, झेंडू आदी उच्च प्रतीची रोपे मागवून आपल्या शेतात लागवड करीत आहेत. कासा, चारोटी, सारणी, उर्से, चिंचपाडा, वांगर्जे, सूर्या नगर, वाघाडी, धरमपूर, सोनाळे, महालक्ष्मी, ओसरविरा आणि इतर भागात या कालव्याच्या पाण्यावर किंवा विहिरीच्या पाण्यावर विविध पालेभाज्या, फलभाज्या लागवड करत आहेत.
भातशेतीपेक्षा अनेक पटीने चांगले उत्पन्न फळ आणि भाजीपाला लागवडीतून मिळत आहे. तसेच कमी कालावधीत आर्थिक फायदाही अधिक होतो. यामुळे लहान-मोठे शेतकरी या फळ आणि भाजीपाला शेतीकडे लक्ष देत आहेत.
भेंडी, गवार, पालक, मुळा, वांगी, दुधी, मेथी अशा भाज्या बाजारात विक्री करून घर खर्च भागवला जात आहे. अनेक मोठे शेतकरी तर झेंडू फुले, मिरची लागवड करून उत्पन्नमिळवीत आहेत.
रोप खरेदीसाठी गर्दी
कृषी खात्यातर्फे विविध योजनांची माहिती घेऊन संकरित बी-बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत. ही उच्च प्रतीची रोपे १०० ते १३० रुपयांची १०० नग अशी विकत घेतली जातात. यासाठी या परिसरातील कृषी केंद्रातही विविध रोपे विकण्यास ठेवली आहेत. अनेक ठिकाणी भात कापणी सुरू असून लगेच भाजीपाला रोपांची लागवड सुरू होणार असून रोपे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.
ग्रामीण भागात शेतकरी भाजी, फळे आणि फूल लागवडीकडे वळले आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अद्ययावत रोपे आणून देत आहोत.
- सुरेश बेंदर, कृषी केंद्र चालक
लवकर हाती येणाऱ्या भाजीपाला, फलभाज्या लावत आहोत. यामुळे दीड ते दोन महिन्यांत आम्हाला उत्पन्न मिळते. तसेच यापुढे शेवगा, पपई, झेंडू यांची लागवड करणार आहोत.
- नरेश घोषा, शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.