वर्धा जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची वाढली चिंता

पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्याने लहान कोंब नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. पाऊस लवकर पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली.
Kharip Crops
Kharip CropsAgrowon

वर्धा : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी रिमझीम पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या (Kharip Crops) दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्याने लहान कोंब नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. पाऊस लवकर पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली.

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्‍याने शेतकरी सुखावला होता आणि पेरणीची लगबगही सुरू झाली होती. मात्र पेरणीयोग्य पाऊस पडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली. परिणामी पेरणीची कामे लांबणीवर जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पाऊस समाधानकारक पडत नसल्याने पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील काही भागांत तुरळक पाऊस, तर काही भागात उन्हाळी वातावरण आहे. त्‍यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काही भागांत रोपे उगवली आहेत, परंतु पुरेसा पाऊस न पडल्‍याने काही शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून रोपांना पाणी देत आहेत.

पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांची (Kharip Crops) पेरणी केली. परंतु त्यावर पाऊस पडला नाही, यामुळे दुबार पेरणीचे संकट बळीराजावर येऊन ठाकले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात बियाणे (Seeds)आणि खतांच्या (Fertilizer) किमतीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी महागाईने घेतलेल्या बियाण्यांची शेतात पेरणी केली. मात्र काही भागात कडक ऊन पडल्याने पिकांचे कोंब जळून जात आहेत. पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहे.

यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे आम्ही यावर विश्‍वास ठेऊन पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारली. हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरले. त्यामुळे आमच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे हवामान विभागाने असे चुकीचे अंदाज वर्तविणे बंद करावे.

- पुरुषोत्तम तिघरे, शेतकरी, पवनार

कृषी विभागाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका अशा सूचना दिल्या होत्या. ठिकठिकाणी बैठका घेत याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक संकट ओढवले आहे.

परमेश्‍वर घायतीडक, तालुका कृषी अधिकारी, वर्धा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com