
नांदेड : जिल्ह्यात खत उत्पादक कंपन्या (Fertilizer Producer) व ठोक खत विक्रेत्यांच्या सहमतीने रासायनिक खतांची लिंकिंग (Fertilizer Linking) करून किरकोळ विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. या प्रकाराला कृषी विभागाचीही (Agriculture Department) मुकसंमती आहे.
यामुळे आगामी काळात लिंकिंग विरहित व सुरळीत खत पुरवठा करावा. अन्यथा अर्धापूर तालुक्यात रासायनिक खते विक्री बंद आंदोलन करण्याचा इशारा अर्धापूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दिला आहे.
खरीप हंगाम २०२२ मध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या डीएपी, एमओपी, १०:२६:२६, १२:३२:१६, युरिया या मुख्य खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. त्याचाच गैरफायदा घेत रासायनिक खत कंपन्या व घाऊक विक्रेते यांच्या संगनमताने मागणी असलेल्या मुख्य रासायनिक खतांसोबत शेतकऱ्यांकडून मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रोनुट्रीयंट, वॉटर सोलूबल खते आदींचे मुख्य खतासोबत लिंकिंग करण्यात आले.
तालुकानिहाय खतांचे समान वाटप करण्याची जबाबदारी कृषी विकास अधिकाऱ्यांची असताना नांदेडमधील ठराविक घाऊक विक्रेते व रासायनिक खत कंपन्या त्यांच्या पद्धतीने कृषी विकास अधिकाऱ्यांना डावलून फक्त लिंकिंगचा माल घेणाऱ्या विक्रेत्यांनाच मोठ्या प्रमाणात खतांचे वाटप करत होते.
हे सर्व चालू असताना यावर्षीच्या खरीप हंगामात लिंकिंगच्या तक्रारी येऊनही कृषी विभागाने फक्त बघ्याची भूमिका घेतली होती, असे निवेदनात म्हटले आहे.
रब्बी हंगामाची पेरणी संपूनही युरिया या खतासोबत इतर गरज नसलेली खते घेण्याची बळजबरी करण्यात येत आहे. त्यामुळे मागणी नसलेली इतर खते मुख्य खतासोबत शेतकऱ्यांना दिली जातात.
त्याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याने ऐन खरीप व रब्बी हंगामात काही किरकोळ विक्रेत्यांचे खत विक्री परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांनी लिंकिंगच्या त्रासाला कंटाळून खते न विकण्याची भूमिका घेतली आहे.
...तर कृषी विभाग जबाबदार
शेतकऱ्यांकडून मागणी असलेली मुख्य रासायनिक खतेही मागविण्यासाठी किरकोळ विक्रेते उत्सुक नाहीत. याचा परिणाम येणाऱ्या पुढील हंगामात खत पुरवठा करण्यावर होऊ शकतो. लिंकिंगच्या कारणाने रासायनिक खते वितरणात अडचणी निर्माण झाल्यास त्याला कृषी विभाग जबाबदार राहील, असा इशारा किरकोळ खत विक्रेत्यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.