
औरंगाबाद ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यंदा रब्बीत (Rabi Season) जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविना (Rabi Sowing) असल्याची स्थिती आहे. खरिपात अति पावसाने दाणादाण उडविल्यानंतर शेतकऱ्यांच्या (Farmer) सर्व आशा रब्बीवर अवलंबून आहेत. मात्र, जमिनीत वापसा नसल्याने पेरणीस विलंब झाला. अद्यापही अनेक ठिकाणी पेरण्या सुरू असल्याची स्थिती आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २१ लाख ५ हजार १११ हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. परंतु १ डिसेंबर अखेरपर्यंत आठ जिल्ह्यात मिळून १८ लाख २८ हजार १६८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे जवळपास २ लाख ७६ हजार ९४२ हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविना असल्याची स्थिती आहे.
पेरणी झालेल्या क्षेत्रात लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील १२ लाख १४ हजार २१२ तर औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार ९५६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत लातूर कृषी विभागात ८९ टक्के तर औरंगाबाद विभागात ८२ टक्के रब्बीची पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
पीक उगवण व वाढीच्या अवस्थेत
मराठवाड्यात हरभरा वगळता एकाही पिकाची अपेक्षित क्षेत्रावर अजून पेरणी झाली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रातील पीक सध्या उगवण व वाढीच्या अवस्थेत आहेत.
११ लाख २७ हजार हेक्टरवर हरभरा
मराठवाड्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख २२ हजार ९७३ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ११ लाख २७ हजार ८४९ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये लातूर विभागातील ८ लाख ६१ हजार ३६५ हेक्टरसह, औरंगाबाद विभागातील २ लाख ६६ हजार ४८४ हेक्टरवरील हरभरा पिकाचा समावेश आहे. लातूर विभागात हरभऱ्याच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११० टक्के तर औरंगाबाद कृषी विभागात ११२ टक्के हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
औरंगाबाद १९०,९३५ १०४,८११ ५४.८९
जालना २१७,८९२ २०८५४३ ९५.७१
बीड ३३२३५३ ३००६०२ ९०.४५
लातूर २८०४३७ २८९५१६ १०३
उस्मानाबाद ४१११७२ ३५२८५९ ८६
नांदेड २२४६३४ २४२१८७ १०८
परभणी २७०७९५ १९२१२५ ७१
हिंगोली १७६८९३ १३७५२५ ७८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.