
Nashik News : जिल्ह्यातील आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृह येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा सामंजस्य करार सोहळा आदिवासी मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, व्यवस्थापक (लेखा) मनोजकुमार शर्मा, संचालक विकास वळवी यांच्यासह विविध संस्था व बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे.
त्यानुसार बचत गट, वनधन केंद्र, ग्रामीण समूह, फळ प्रक्रिया उद्योजक, राइस मिल, वनऔषधी उद्योजक, गृहोद्योग यांना आवश्यक वित्त पुरवठा करण्यात शबरी महामंडळ अग्रेसर, असल्याचे डॉ. गावित यांनी या वेळी सांगितले.
मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, की ज्या भागात जे वनउपज उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या उद्योगासाठी केला पाहिजे. उद्योगासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.
आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून आदिवासी महिला उद्योजक सुद्धा पुढे येत आहेत. या वेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एन. डी. गावित, रायासिंग वळवी, रमेश सवरा, चैराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.