
Nashik Heat Wave : जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत असून तापमान ४० अंश पार गेले आहे. या कडक उन्हामुळे नाशिक तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी घेतला आहे. नाशिक तालुक्यातील राहुरी येथील शेतकऱ्यास दुपारी शेतात काम करीत असताना अचानक चक्कर आली.
उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून त्यांना मयत घोषित केले. साहेबराव शांताराम आव्हाड (५५, रा. राहुरी विंचुरी, ता. नाशिक) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
साहेबराव आव्हाड हे गुरुवारी (ता. ११) दुपारी घरच्या शेतामध्ये काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णतेची लाट असल्याने कमाल पारा ४० अंश सेल्सिअसवर आहे.
गुरुवारीही उन्हाची तीव्रता वाढलेली असताना साहेबराव आव्हाड हे भरउन्हात शेतात काम करीत होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना चक्कर आल्यासारखे झाले.
त्यामुळे त्यांचा भाऊ गोरखनाथ आव्हाड यांनी साहेबराव यांना तातडीने उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी डॉ. मनिषा होनराव यांनी तपासून त्यांना पावणे चार वाजेच्या सुमारास मयत घोषित केले.
तळपत्या उन्हामुळेच त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार बाळू भवर हे पुढील तपास करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.