
विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः संत्रा उत्पादकांसाठी (Orange Producer) महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाच्या प्रकल्पाचा (Patanjali Project) पहिला टप्पा जानेवारी महिन्यात कार्यान्वित होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने संत्र्यावर प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीची तयारी दर्शविली होती. त्यानुसार राज्य सरकारने मिहानमधील जागा या प्रकल्पाकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली. त्यानंतरही गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प तसूभरही पुढे सरकला नाही. त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये रोष निर्माण झाला होता. सवलतीच्या दरात जागा घेणे हाच रामदेबाबा यांचा उद्देश होता की काय, असा प्रश्नही संत्रा उत्पादक उपस्थित करीत होते. पतंजलीकडून मात्र लवकरच प्रकल्प कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असल्याने प्रकल्पाच्या नेमक्या स्थितीबाबत कोणालाही कळण्यास मार्ग नव्हता.
आता राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच खुलासा केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एक हजार टन रोज प्रक्रिया होईल, अशी पतंजलीच्या या प्रकल्पाची क्षमता आहे. छोट्या मालावर प्रक्रिया झाल्यास मोठ्या आकाराच्या फळांना देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इतर देशांत निर्यातीची गरज भासणार नाही, अशी अपेक्षा महाऑरेंजकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने २३० एकर जमीन कमी दरात उपलब्ध करून दिली होती. १००० कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर पतंजली करणार होती.
अजित पवार यांनीच या मुद्याला सभागृहात बळ देण्याचे काम केले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दोष देण्याऐवजी या भागातील नेत्यांनी संत्र्यासाठी काय केले? तरीसुद्धा संत्र्याबाबत एक धोरण ठरविले पाहिजे. मार्केटिंग, निर्यात शुल्क, प्रक्रिया या बाबींचा त्यामध्ये समावेश करण्याची गरज आहे.
- मनोज जवंजाळ,
संचालक, महाऑरेंज
‘सह्याद्री’कडून २०० टनांवर प्रक्रिया
नांदेड येथील राज्यातील एकमेव संत्रा प्रक्रिया प्रकल्प अडचणीत आला होता. हा प्रकल्प आता सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीकडून चालविला जात आहे. २०० टन छोट्या आकाराच्या संत्रा फळावर येथे प्रक्रिया होते. त्यामुळे संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.