पुणे : किमान तापमानाचा (Minimum Temperature) पारा वाढल्याने राज्यात गारठा (Cold Weather) कमी झाला आहे. दिवसा मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा (Heat) चटका कायम आहे. आज (ता. २) राज्यात कोरड्या हवामानासह (Dry Weather), तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात झालेली वाढ, यामुळे गेली आठवडाभरापासून राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे राज्यात आलेली गुलाबी थंडी ओसरली आहे. उन्हाचा चटका कायम असून, कमाल तापमानाचा पारा कायम असून, उकाडाही वाढला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी-अधिक होत आहे.
राजस्थानातील चुरू येथे गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.२ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानातील वाढ कायम असून, बहुतांशी ठिकाणी पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान २९ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
कमी दाब क्षेत्र तमिळनाडूकडे येणार
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ रविवारपर्यंत (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही प्रणाली तीव्र होऊन तमिळनाडू, पद्दूचेरीच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.
गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (११.९), जळगाव ३१.४ (१३.७), धुळे ३१ (११), कोल्हापूर ३१ (१६.८), महाबळेश्वर २६.७ (१२.८), नाशिक ३० (१३), निफाड २९.८ (११), सांगली ३२(१५.८), सातारा ३०.९ (१६.६), सोलापूर ३२.७ (१५.१), सांताक्रूझ ३५.२ (२०.४), डहाणू ३२.३ (१९.६), रत्नागिरी ३४.७ (२०.३), औरंगाबाद २९.६ (१०.८), नांदेड ३२.६ (१३.६), उस्मानाबाद ३१.२ (१५.२), परभणी ३०.२ (१२.६), अकोला ३१ (१४.२), अमरावती ३०.६ (१३.७), बुलडाणा ३०.४ (१४), ब्रह्मपुरी ३१.५ (१४.६), चंद्रपूर २८.४ (१४.६), गडचिरोली ३०.२ (१३.२), गोंदिया २८.८ (१२.४), नागपूर २९.४ (१३.२), वर्धा २९.९ (१३.८), यवतमाळ ३३ (१२).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.