
नगर : ‘‘ग्रामीण भागाचा विकास (Rural Development) साधायचा असेल तर संघटन शक्ती महत्त्वाची आहे. सरपंच परिषदेने ते साध्य करून दाखवले आहे. सरपंच परिषदेमुळे ग्रामविकासाला बळ मिळेल,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केले. सरपंच परिषदेचा वर्धापन दिन राळेगणसिद्धीत शुक्रवारी (ता. २३) साजरा झाला. या वेळी आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आदर्श गावाचे सरपंच भास्कर पेरे, परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे उपस्थित होते.
या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व आमदार श्रीकांत भारतीय यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. हजारे म्हणाले, ‘‘राळेगणसिद्धी येथून सरपंच परिषदेची जी मुहूर्तमेढ रोवली, त्याचा आता चांगला विस्तार होत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी संघटन शक्ती महत्त्वाचे आहे. ही शक्ती परिषदेद्वारे उभी राहिली, ही बाब निश्चितच ग्रामविकासासाठी बळ देणारी आहे.
कोणाला तरी पुढे जाण्यासाठी कोणाचा तरी त्याग असतो. अशाच त्यागातून परिषद पुढे आली. परिषदेद्वारे ग्रामविकास साधला जाईल.’’ पवार म्हणाले, ‘‘ग्रामीण भागाचा विकास गावचा गावगाडा चालवणारा सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. त्याने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. वित्त आयोगाच्या पैशात मोठ्या प्रमाणावर कपात होत आहे, ही कपात थांबली पाहिजे.
पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, तो राखला गेला पाहिजे. तरच गावे बलशाली होतील.’’ अॅड. विकास जाधव यांनी प्रस्ताविक केले. जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, राज्य महिला अध्यक्षा राणी पाटील, आनंदराव जाधव, राजाराम पोतनीस, शिवाजी मोरे, सुधीर पठाडे, पांडुरंग नागरगोजे, नारायण वनवे, किसन जाधव, अरुण कापसे, सुषमा दिसले, बाळासाहेब धुमाळ, योगिनी देशमुख, आदिनाथ देशमुख, संभाजी सरदेसाई, युवराज पाटील, श्रीकांत पाटील, अंबादास गुजर उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.