
पुणे : ‘आरक्षणाकडून (Maratha Reservation) अर्थकारणाकडे’ (Economy) या संकल्पनेवर आधारित संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी एकदिवसीय अधिवेशन आज (ता. २८) येथील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सकाळी १० ते सायं. ७ दरम्यान होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. या वेळी इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव, तर अभिनेते अशोक समर्थ आणि लेखक अरविंद जगताप हे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सायंकाळी समारोप सत्रात माजी कृषिमंत्री शरद पवार हे प्रमुख उपस्थित असून, अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार या मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
‘‘एकविसावं शतक आहे. लोकांना ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळत आहे. मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी, तसेच महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा तो प्रत्येक जण ही भूमिका घेऊन आम्ही त्यांच्यासाठीही काम करणार आहोत. ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूख आपुला’ हा नवा विचार आम्ही मांडला आहे. पैशाला, व्यापाराला जात नसते आणि ज्या वेळी आम्ही सीमा ओलांडायचा विचार करतोय, त्या वेळी जातींचे विसर्जन केले पाहिजे. जातीअंताची लढाई लढण्याच्या बाजूचा मी आहे.’’
- प्रवीण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
चर्चासत्रे...
पहिले सत्र : खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणानंतरचा भारत आणि जग : सहभाग : पृथ्वीराज चव्हाण, ‘सकाळ समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड
दुसरे सत्र : स्टार्टअपसचे युग : सहभाग : माजी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मिटकॉन फोरम संचालक गणेश खामगळ
तिसरे सत्र : आरक्षणाकडून अर्थकारणाकडे : सहभाग : क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ‘सह्याद्री फार्म्स’चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, ‘सिल्व्हर ज्युबिली मोटर्स’च्या व्यवस्थापकीय संचालक राजवर्धिनी जगताप, ‘बीव्हीजी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.