फळे, भाजीपाला विक्री आता रेशन दुकानांमधून

शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिली मुभा; पुणे, ठाणे, मुंबईत प्रायोगिक मान्यता
फळे, भाजीपाला विक्री आता रेशन दुकानांमधून
Vegetable On Ration ShopAgrowon

पुणे ः राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmer Producer Company) सार्वजनिक शिधावाटप (Ration Shop) (रेशन) दुकानांमधून भाजीपाला व फळे विक्रीसाठी (Fruits And Vegetable) प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) घेतला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यात पुणे आणि मुंबई अशा दोन भागांमध्ये पहिल्या टप्प्यात दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे येथील शाश्‍वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीला पुणे जिल्ह्यात तर नाशिकमधील फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विक्रीची परवानगी दिली गेली आहे.

“शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे या दोन्ही एफपीसींकडून येत्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर संबंधित जिल्ह्यांमधील शिधावाटप दुकानांमार्फत विकता येईल,” अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे अवर सचिव गजानन देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ‘कोणत्याही एफपीसीला संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांवर मालविक्रीबाबत सक्ती करता येणार नाही. फळे व भाजीपाला या व्यतिरिक्त इतर माल, उत्पादन व वस्तूंची विक्री या दुकांनामधून करता येणार नाही. हा व्यवहार फक्त दुकानदार व एफपीसीमध्येच असेल. त्यात शासनाचा कोणताही सहभाग नसेल,’ असे अन्नपुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

‘‘राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने स्वस्त धान्य दुकानांद्वारे फळे व भाजीपाला विक्रीसाठी मान्यता देण्याचा निर्णय शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळकटी देणारा ठरेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास एफपीसींना विपणन व्यवस्थेत आणखी नव्या संधी मिळतील व त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला हातभार मिळेल.’’
कृषी आयुक्त धीरज कुमार

केवळ १०० रुपयांच्या हमीपत्रावर व्यवहार

राज्य शासनाने या उपक्रमामध्ये एफपीसींवर कोणत्याही जाचक अटी लादलेल्या नाहीत. एफपीसीने फक्त १०० रुपयांच्या मुद्रांकावर अटी-शर्ती मान्य असल्याचे हमीपत्र देताच व्यवसाय सुरू करावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com