खतांसाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुखांची मदत घ्या

कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या सूचना
खतांसाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुखांची मदत घ्या
FertilizerAgrowon

पुणे ः ‘‘राज्यातील खताच्या पुरवठ्याचे (Fertilizer Supply) नियोजन करताना अडचणी आल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांची मदत घ्यावी,’’ असा सल्ला कृषी आयुक्तांनी दिला आहे.

कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत. “जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांचे (एडीओ) कामकाज संनियंत्रित करावे. ‘एडीओ’ने जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने खत (fertilizer) पुरवठ्याचे नियोजन करावे. संबंधित तालुक्यांमध्ये खताचा तुटवडा जाणवल्यानंतर पोलिस बळाची आवश्यकता भासू शकते. अशावेळी ‘एसएओ’ने थेट जिल्हा पोलिस प्रमुखांशी समन्वय ठेवून परिस्थिती हाताळावी,” असे आयुक्तांनी सूचित केले आहे.

खतांचा काळाबाजार, साठेबाजी, चढ्या दराने खताची विक्री व खत असतानाही उपलब्ध न करून देणे अशा समस्या हाताळण्यासाठी तालुकास्तरापर्यंत भरारी पथके तयार करावीत. जिल्हा व तालुका खत नियंत्रण कक्ष तयार करावेत, बफर स्टॉकचे नियोजन करावे, पर्यायी खतांसाठी प्रसार व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जैविक खतांची पुरेशी उपलब्धता करावी, तसेच टंचाईच्या काळात रासायनिक खतांचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

आयुक्तांनी खतांच्या पुरवठा नियोजनात ‘जेडीए’ अर्थात कृषी सहसंचालकांना देखील जबाबदारी दिली आहे. रेल्वे खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत कृषी सहसंचालकांनी सातत्याने समन्वय ठेवावा. तसेच कृषी आयुक्तालयाला क्षेत्रीय पातळीवरून अत्यावश्यक असलेल्या सर्व माहितीचे संकलन कृषी सहसंचालकांना करावे लागणार आहे. सहसंचालकांच्या कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सध्या केवळ बदल्यांमध्ये मश्गूल आहेत. त्यांनाही आयुक्तांनी कामाला लावले आहे.

सहसंचालकांच्या कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दर आठवड्याला एडीओकडून खत पुरवठ्याचे कंपनीनिहाय रेक नियोजन प्राप्त करून घेण्याची जबाबदारी आयुक्तांनी दिली आहे. आवंटनाप्रमाणे खतांचा पुरवठा होतो की नाही, यासाठी कंपनीच्या राज्य प्रतिनिधींच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी अधीक्षकांना दिली गेली आहे.

आयुक्त म्हणतात,..‘असे करा नियोजन’
- एमएफएमएस संकेतस्थळावर खत उपलब्धता तपासावी
- रेल्वे अधिकारी, माथाडी, वाहतूकदारांशी समन्वय ठेवा
- एडीओ, एसएओ आणि जेडीए यांनी आयुक्तालयाला संयुक्त अहवाल द्यावेत
- खत उपलब्धता सर्वत्र समप्रमाणात ठेवा
- घाऊक विक्रेत्यांकडून योग्य प्रमाणात सर्व किरकोळ विक्रेत्यांना वाटप होते की नाही याची खात्री करा
- दरमहा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घ्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com