
Pune News : राज्यातील सर्व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे ‘जीआयएस मॅपिंग’ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन आराखडा, वन क्षेत्रातील मालकी हक्क, वनसंपत्ती, जलस्रोत, वन्यप्राणी, वारसा जतन स्थळे, रस्ते आराखडा, वीज वाहिन्यांचे जाळे आदींसह ३३ घटकांची माहिती पहिल्यांदाच नकाशावर दिसणार आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या बाबतचे आदेश काढले आहेत. तशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे मॅपिंग करण्यासाठी संपूर्ण क्षेत्राची ड्रोन सर्वेक्षणाद्वारे इमेज घेऊन ओव्हर लॅपिंगसह प्रोसेसिंग करून जीपीएस पद्धतीने बेस मॅप तयार करण्यात येणार आहे.
पर्यटन विकास आराखड्यातील सर्व बाबी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून घेणे, तसेच निवास व न्याहारी या बाबतचे तपशील जमा करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना नगर विकास विभागाने दिल्या आहेत.
अशा प्रकारची माहिती नकाशावर उपलब्ध झाल्यास पर्यटन क्षेत्र कुठे आहे, तेथे राहण्याची सुविधा ही माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच संवेदनशील क्षेत्रातील पर्यावरण, विहिरी, नदी, तलाव, नाले, ओढे त्यांचे उगम स्थान याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जलस्रोत, वनसंपत्तीची माहिती
गावनिहाय इंधनाचा वापर, मोबाईल टॉवर, भूकंप क्षेत्र अथवा पूर, जमीन खचणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पायाभूत सुविधा प्रकल्प, वीज वाहिनी, भूजलाची माहिती, पवनचक्की, खाणपट्टे, अग्निप्रवण क्षेत्र, रस्ते, व्याघ्र प्रकल्पाचे अथवा वन विभागाचे बफर झोन,
पर्जन्यमान, मैलाशुद्धीकरण प्रकल्प, घन कचरा व्यवस्थापन, प्रेक्षणीय स्थळे, वारसा जतन स्थळे, जलस्रोत, वनसंपत्ती आदींची माहिती विविध विभागांच्या सहकार्याने एकत्रित करून ती नकाशावर दर्शविण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.