
अकोला : राज्यात काही जिल्ह्यांत अतिपावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे, जमिनींचेही मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्या (Re Sowing) करूनही पिके पाण्याखाली (Crop Underwater) गेली. तर काही ठिकाणी जमिनीत पाणी साचल्याने दुबार पेरणीदेखील करता आली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई (Compensation) म्हणून मदत करणे आवश्यक आहे. शासनाने पंचनामे करण्याची औपचारिकता न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupakar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली.
तुपकर यांनी मंगळवारी (ता. २) मुंबई येथे मंत्रालयात फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढवली. शेतात पाणी घुसले. लाखो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच शेतकऱ्यांना लिंकिंग पद्धतीने जबरदस्ती जास्तीचे पैसे देऊन खते घ्यावी लागली. खतांच्या वाढलेल्या किंमतही आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला. पेरणीसाठी या वर्षी अधिक खर्च करावा लागला. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय लाखो शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज भेटलेले नाही. प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.
आता राज्य शासनाने पंचनाम्याची औपचारिकता न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. या मागण्यांचे लेखी निवेदनही त्यांनी दिले.
‘मदतीसाठी सरकार सकारात्मक’
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. लवकरच या बाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.