वारकऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्या

उपमुख्यमंत्री पवार ः संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक
वारकऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्या
Ajit PawarAgrowon

पुणे ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संत तुकाराम आणि ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा (Palkhi Sohala) दोन वर्षांनी होतो आहे. यामुळे वारकऱ्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. तसेच, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ज्या भाविकांनी कोरोना लसीची (Corona Vaccination) दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना लसीकरणाची सुविधा (Vaccination Facility) करण्यात यावी, याबाबत जनजागृतीसह पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आदेश आणि सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या.

‘पालखी सोहळा -२०२२’ पूर्वतयारी आढावा बैठकीत रविवारी (ता. ५) श्री. पवार बोलत होते. या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.’’

पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत, सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावी, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावेत. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्या दृष्टीने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळा चांगल्यारीतीने संपन्न व्हावा यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली.

‘आषाढी वारी ॲप’चे उद्घाटन

बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामाचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाइव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्त्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील माहिती दिली. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्नारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.

पंढरपूरला २४ हजार कर्मचारी तैनात

सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर दिली. रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण १ हजार अधिकारी आणि २५ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी कायमस्वरूपी २४ हजार आहेत. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पत्राशेड तयार करण्यात आले आहे. पुलांचे काम सोडून इतर कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होतील, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com