
Nagpur News : पूर्व विदर्भात मालगुजारी तलावाच्या रूपाने मत्स्यपालन व्यवसायाला पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. पंतप्रधान किसान क्रेडिट-मत्स्यपालन योजनेअंतर्गत या भागातील मत्स्योत्पादकांना जास्तीत-जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बँकांना केल्या.
केंद्रीय अर्थमंत्रालय, राज्यस्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँक नागपूर यांच्यावतीने हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे ‘विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे आर्थिक समावेशन आढावा बैठक’ आयोजित करण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. कराड पुढे म्हणाले, की पीएममुद्रा योजनेअंतर्गत शिशुगटात उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हेरून त्यांना वाढीव कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. तरुण गटासाठी असलेल्या या योजनेतील तरतुदीमध्ये जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगारांना समाविष्ट करावे. बँकांनी त्यांना नेमून दिलेल्या किमान उद्दिष्टांकडे लक्ष न ठेवता त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल याला अधिक प्राधान्य द्यावे, अशा सूचना या वेळी मंत्र्यांनी केल्या.
सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या या योजना आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना परफॉर्मन्स ऑडिट करणे गरजेचे असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीतील कामगिरीचा अहवाल बँकांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. आर्थिक समावेशासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या कामगिरी विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जिल्हानिहाय माहिती जाणून घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी या योजना आखल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी ही योजना लोकप्रिय व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व बँकर्सनी गांभीर्याने उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, उपमुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान जनधन योजना ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेच्या लाभार्थींसोबत बँकेचा समन्वय असावा. त्यासाठी संपर्क वाढवावा अशा सूचना त्यांनी केल्या. डिजिटल ट्रान्झॅक्शन संदर्भात बँक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात वाढ करा, असे निर्देश त्यांनी दिले.
पीएमस्वनिधी योजनेबाबत विदर्भात चांगले कार्य झाले आहे, याबाबत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष ए. बी. विजयकुमार यांनी प्रास्ताविक केले. समितीचे सदस्य सचिव राजेश देशमुख यांनी योजनांच्या आढाव्या संदर्भात सादरीकरण केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.