महाराष्ट्राचं सोडा, पूरग्रस्त नागरिकांना मदत करा: ममता बॅनर्जींच्या आसाम सरकारला कानपिचक्या

गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदे आणि त्यांचे समर्थक वास्तव्यास आहेत. भाजप या आमदारांची संपूर्ण व्यवस्था करत आहे. आसाम सरकार याच कामांत व्यस्त आहे. राज्यातील संकटाविषयी भाजप सरकारला सोयरसुतकही नाही, अशी टीका ममता यांनी केली.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeAgrowon

कोलकाता : आसाम राज्यात पुरस्थिती गंभीर बनली आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने राज्यातील पूरग्रस्त जनतेला आधार देणे गरजेचे आहे. मात्र आसाममधील भाजप सरकार महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात व्यस्त आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची बडदास्त ठेवत असल्याची टीका बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केली.

आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यातील ३४ पैकी ३२ जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरु आहे. पुरामुळे तब्बल ५५ लाख नागरिकांना मेटाकुटीला आणले. तर आसाममध्ये आत्तापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सरकारी माहितीनुसार मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२१ महसुली भागांतील ५ हजार ५७७ गावांचे नुकसान झाले आहे. तर ८६२ मदत शिबिरांमध्ये दोन लाख ६२ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे.

नगांव हा पुरामुळे सर्वांत फटका बसलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. यामधील १५ हजार १८८ जणांनी १४७ मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma)आणि भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले.

Mamata Banerjee
शिंदे गटासमोर विलीनीकरणाची अट: प्रकाश आंबेडकरांचा दावा

आसाम सरकारने स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे, अशा शब्दांत ममता यांनी सत्ताधारी भाजपला सुनावले. आसाममध्ये सर्वसामान्य नागरिक महापुराने त्रस्त आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)पक्षाच्या आमदारांना घेऊन आसाम मुक्कामी आले आहेत. गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदे आणि त्यांचे समर्थक वास्तव्यास आहेत. भाजप या आमदारांची संपूर्ण व्यवस्था करत आहे. आसाम सरकार याच कामांत व्यस्त आहे. राज्यातील संकटाविषयी भाजप सरकारला सोयरसुतकही नाही, अशी टीका ममता यांनी केली.

एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज दिले. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. अपक्षांसह काही खासदारही तिथे पोहोचत असल्याचे वृत्त आहे. आसाम सरकार महाराष्ट्रातील सेनेच्या बंडखोरांची पुरेपूर काळजी घेत असल्याचे वृत्त आहे. सरकारचे मंत्री अशोक सिंघल यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

Mamata Banerjee
मुख्यमंत्री विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार?

सरकार पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत आहे, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसने शिवसेनेचे बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलसमोर आंदोलन केले. तृणमूल काँग्रेसच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले.

आसाममधील सुमारे २० लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. पण मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. महाराष्ट्राचे बंडखोर आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या दिमतीला आमचे आसामचे मंत्री पोहोचत आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करत असल्याचे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. दरम्यान,आसाममध्ये गेल्या २४ तासांत आणखी १२ जणांचा पुरामुळे मृत्यू झाला. आता पुरामुळे एकूण मृतांची संख्या १०० झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com