
डॉ. अनुजकुमार कोळी, डॉ. अनिल पाटील
Shelly Breeding Society : शेळीचा प्रजनन दर तसेच एका वेळी एकाहून अधिक पिले देण्याच्या क्षमता शेळीमध्ये (Goat) असते. शेळी जवळपास १३ महिन्यांमध्ये दोन वेळा पिलांना जन्म देते. शेळ्यांमध्ये गाभण कालावधी हा साधारणपणे १५० ते १५५ दिवसांचा असतो.
या दरम्यान गाभण शेळ्या (Pregnant Goat) आणि गर्भातील पिलांच्या वाढीकरिता अधिकचा खुराक देणे गरजेचे असते. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर प्रजनन संस्थेचे किंवा चयापचयाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी या काळात योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
योग्य नियोजन, पशुवैद्यकीय सल्ला व प्राथमिक उपाययोजना केल्यास शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
प्रजनन संस्थेमध्ये येणारे अडथळे ः
१) गर्भपात ः
शेळ्यांमध्ये गर्भपात हा विविध कारणांनी होतो. त्यापैकी स्त्रीजन्य संप्रेरकांचा प्रभाव असलेल्या चाऱ्याचा समावेश, शेळ्यांची एकमेकांना धडक होणे किंवा इतर जंतुसंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव ही महत्त्वाची कारणे आहेत.
२) प्रसूतीतील अडथळा ः
१) प्रसूतीदरम्यान करडू अडणे हा प्रजनन संस्थेमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात येणारा अडथळा आहे. त्यामध्ये शेळ्यांची व पिलांची मरतुक होण्याचे प्रमाण अधिक असते.
२) शेळी विण्यासाठी सर्वसाधारण कालावधीपेक्षा अधिक वेळ घेत असल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क साधावा.
३) प्रसूती कालावधी हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला असतो. पहिला कालावधी ६ ते १२ तासांचा असतो. यात शेळी स्वतःला कळपापासून दूर करते. शेळीची चलबिचल वाढलेली असते.
या दरम्यान गर्भाशय मुख उघडण्यास सुरुवात होते. त्यानंतरचा कालावधी हा अर्धा ते १ तासांचा असतो. ज्यामध्ये गर्भाशय आकुंचन पावते व शेळी पिलाला जन्म देते. तिसरा कालावधी हा ३ ते ४ तासांचा असतो, यात झार किंवा वार पडतो.
३) मायांग किंवा गर्भाशय बाहेर येणे ः
मायांग बाहेर येण्याचे प्रमाण हे शेळ्यांमध्ये कमी दिसून येते. आहारात अधिक प्रमाणात हिरवा चारा, पौष्टिक आहाराची किंवा घटकांची कमतरता, अवघड प्रसूती, विण्यासाठी जास्त कालावधी लागणे किंवा आनुवंशिकता ही गर्भाशय बाहेर येण्याची कारणे असू शकतात.
४) वार अडकणे ः
१) विल्यानंतर साधारणपणे ३ ते ४ तासांमध्ये वार पडतो. परंतु काही संप्रेरकांचा अभाव, गर्भाशय आकुंचन न पावणे किंवा वार गर्भाशयापासून वेगळे न होणे ही वार अडकण्याची करणे आहेत.
२) वार अडकल्याने गर्भाशय योग्य स्थितीत राहत नाही. तसेच शेळीला गर्भाशयाच्या विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वरित पशुवैद्यकांकडून योग्य उपचार करून घ्यावेत.
५) गर्भाशय दाह ः
बऱ्याच वेळा वार न पडल्याने गर्भाशयामध्ये योनीमार्गातून जंतुसंसर्ग होऊन गर्भाशय दाह होण्याची शक्यता असते. गर्भाशयाचे मुख अधिक कालावधीसाठी उघडे असल्यास हा आजार होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयातून सतत लाल किंवा पिवळ्या रंगाचे द्रव बाहेर येणे, घाण वास येणे यासारखी लक्षणे आढळून येतात.
चयापाचयाचे आजार ः
१) दुग्धज्वर ः
हा अत्यंत महत्त्वाचा आजार असून, कॅल्सिअमच्या कमतरतेमुळे होतो. विल्यानंतर ४८ तासांपर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये दूध न देणे, शरीराचे तापमान कमी होणे. तसेच शेळ्या एकाच जागी बसून किंवा झोपून राहणे ही लक्षणे आढळून येतात.
२) कितनबाधा ः
१) गाभण काळात व विल्यानंतर शेळ्यांना अधिकचा खुराक देणे आवश्यक असते. अन्यथा शेळ्यांचे ऊर्जा संतुलन बिघडून त्या नकारात्मक ऊर्जा संतुलनामध्ये जातात. दोन किंवा तीन करडे जन्माला येणाऱ्या शेळ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते.
२) या आजारामध्ये प्रामुख्याने शेळ्यांचे वजन कमी होणे, मानसिक संतुलन बिघडणे तोंडाचा व लघवीचा गोड वास येणे ही लक्षणे दिसतात.
उपाययोजना ः
१) बहुतांश वेळेस पहिल्यांदा विणाऱ्या शेळ्यांमध्ये करडू अडण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु एकापेक्षा जास्त पिले देणाऱ्या शेळ्यांमध्ये देखील याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते.
२) गर्भपात टाळण्यासाठी शेळ्यांना संतुलित आहार देणे आवश्यक आहे. आहारामध्ये खनिज मिश्राणांचा वापर केल्यास पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता भासणार नाही.
३) नवीन कोवळ्या चाऱ्यामध्ये स्त्रीजन्य संप्रेरकांचे प्रमाण हे अधिक असते. असा चारा जास्त प्रमाणात दिल्यामुळे गर्भपात होणे किंवा मायांग बाहेर येण्याची समस्या दिसून येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात हिरव्या चाऱ्यासोबत सुक्या चाऱ्याचा समावेश असणे आवश्यक आहे.
४) जंतुसंसर्गामुळे गर्भपात झालेल्या शेळीला इतर निरोगी शेळ्यांपासून वेगळे करावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करून घ्यावेत.
५) शेळी विण्याच्या वेळी शेळीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेळी विण्यास अडचण निर्माण झाल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा. विल्यानंतर शेळी व पिलांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
६) नवजात करडांमध्ये शरीराचे तापमान कमी झाल्याने मरतुक होण्याचे प्रमाण अधिक असते. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये नवजात करडांची विशेष काळजी घ्यावी. विल्यानंतर त्यांना कोरड्या व उबदार ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
७) विल्यानंतर शेळ्यांमध्ये वार न पडल्याने गर्भाशयाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करून घ्यावेत.
८) विल्यानंतर शेळ्यांना डाळ, पीठ, खरकटे पाणी इत्यादी दिल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायलेल्या शेळीला असे पदार्थ देणे टाळावे. आहारात भरडधान्ये, हिरवा व सुका चारा द्यावा.
डॉ. अनुजकुमार कोळी, ९१४५०५०२३७ (पशू प्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.