Goat Farming : शेतकरी नियोजन ः शेळीपालन

जिंतूर तालुक्यातील दुर्गम-डोंगरी भागातील ब्राह्मणगाव येथील बापूराव तारासिंग राठोड हे आठ वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहे.
Goat Farming
Goat Farming Agrowon

शेतकरी ः बापूराव तारासिंग राठोड

गाव ः ब्राह्मणगाव, ता. जिंतूर, जि. परभणी

शेळी संख्या ः १०३

जाती ः शिरोही, बीटल, आफ्रिकन बोअर, उस्मानाबादी

जिंतूर तालुक्यातील दुर्गम-डोंगरी भागातील ब्राह्मणगाव येथील बापूराव तारासिंग राठोड हे आठ वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय (Goat Farming Business) करत आहे. त्यांची डोंगराळ भागात वडिलोपार्जित सात एकर जमीन आहे. शेळीपालन (Goat Rearing) व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य खरिपातील शेती कामे संपल्यानंतर रोजगार हमीच्या कामावर जात.

बापूराव यांना दोन भाऊ आहेत. त्यापैकी गजानन राठोड हे २००४ मध्ये कृषी विभागात कृषी सहायक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. गजानन हे नोकरी करत असले तरी त्यांची शेतीची आवड कायम होती. कृषी विभागात नोकरी करत असताना शासनाच्या विविध योजना, पीक पद्धती याबाबत माहिती त्यांना होत गेली. त्यातूनच २००७ मध्ये शेततळ्यांची उभारणी केली. संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याने कांदा, रब्बी ज्वारी इत्यादी पिकांच्या लागवडीस सुरुवात केली. यातून आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळाल्याने कुटुंबाची रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली.

पुढे त्यांनी गाभण म्हशींचा सांभाळ करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. बघता बघता म्हशींची संख्या ४७ पर्यंत पोहोचली. परंतु त्या वेळी सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली. कडब्याचे दर वाढले तर तुलनेने म्हशींचे दर कमी झाले. त्यामुळे म्हैसपालन व्यवसायाला पूर्णविराम देण्याची निर्णय त्यांनी घेतला.

‘ॲग्रोवन’मधून मिळाली प्रेरणा ः

- म्हैसपालन व्यवसाय थांबविल्यानंतर राठोड हे चांगल्या कृषिपूरक व्यवसायाच्या शोधात होते. दरम्यानच्या काळात दैनिक ‘ॲग्रोवन’ मधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या शेळीपालनाच्या यशोगाथा वाचून त्यांना प्रेरणा मिळाली. धाडस करत शेळीपालन व्यवसायात उतरण्याचे बापूराव राठोड यांनी ठरविले. त्या अनुषंगाने बंधू गजानन सोबत राज्यातील सुमारे ५० ते ६० शेळीफार्मला भेटी दिल्या. शेळीपालकांचे चांगले वाईट अनुभव जाणून घेतले. त्यातूनच इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेळीपालन करण्याचा निश्‍चय त्यांनी केला.

Goat Farming
Goat Farming : शेळ्या, मेंढ्यांतील ‘फ्लशिंग’ फायदेशीर

शेळीपालनाचा श्रीगणेशा ः

सुरुवातीला २०१४ मध्ये उस्मानाबादी जातीच्या ४० शेळ्या आणि दोन बोकड खरेदी केल्या. गोठ्यात मुक्त पद्धतीने त्यांचे संगोपन सुरू केले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतामध्ये चारा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. बंदिस्त शेळीपालनासाठी शेतामध्ये ७४ बाय ८० फूट आकाराचा निवारा उभारला आहे. सध्या त्यांच्याकडे लहान मोठ्या मिळून १०३ शेळ्या आहेत. यामध्ये उस्मानाबादी, आफ्रिकन बोअर, सिरोई, बीटल आदी जातींच्या शेळ्या आणि बोकड आहेत.

विक्री व्यवस्थापन ः

- गोटफार्मवर येऊन व्यापारी तसेच ग्राहक शेळ्या आणि बोकडांची खरेदी करतात.

- या वर्षी पावसाळ्यापूर्वी वयस्कर शेळ्यांची विक्री केली आहे. साधारण १२ शेळ्या आणि २ बोकडांच्या विक्रीतून एकूण १ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये बीटल जातीच्या शेळ्यांना ६०० रुपये किलो, उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांना ३५० रुपये किलो, आफ्रिकन बोअर १५०० ते २५०० रुपये दर मिळाला.

- गोठ्यामध्येच बीटल, उस्मानाबादी, आफ्रिकन बोअर या तीन जातीच्या करडाची पैदास केली जाते.

Goat Farming
Goat Farming : गाभण शेळ्यांना कसे जपाल?

योग्य व्यवस्थापनासाठी ‘टॅग’ची मदत ः

- शेळ्यांचा गाभण आणि जननच्या नोंदी ठेवणे सोपे व्हावे, यासाठी प्रत्येक शेळीच्या कानाला टॅग लावला आहे. तर बोकडांच्या गळ्यात टॅग बांधलेला असतो. टॅगवर क्रमांक नमूद केलेला असतो. यामुळे प्रत्येक शेळीबद्दलची माहिती संकलित करणे सोपे होते.

- शेळी गाभण राहिल्याची, व्याल्याची तारीख, तिच्या पिलाचे वजन या बाबतची तारखेनुसार नोंद घेऊन ती संगणकामध्ये संकलित केली जाते.

व्यवस्थापनातील बाबी ः

- दर महिन्याच्या सहा तारखेला शेळ्यांचे इलेक्ट्रिक वजन काट्यावर वजन केले जाते. त्यानंतर वजन वाढीच्या अनुषंगाने खुराक, वैद्यकीय सुविधांचे नियोजन केले जाते.

- व्यायलेल्या शेळ्या, भाकड शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जातात. वयानुसार पिलाचे, नर आणि मादी वेगवेगळ्या ठिकाणी संगोपन केले जाते.

- पिण्याच्या पाण्यासाठी खास प्रकारचे ट्रे तयार करून घेतले आहेत.

- शेळीपालनासह परसबागेतील कुक्कुटपालन देखील ते करतात. सध्या त्यांच्याकडे २५ देशी कोंबड्या आहेत. या कोंबड्या मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात. त्यामुळे गोचीड, विविध किडे आणि अन्य किडींपासून निवारा मुक्त राहतो.

- जून महिन्याच्या मध्यात गोठ्यातील ३५ ते ३८ शेळ्या गाभण राहिल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात करडांना जन्म देतील. गाभण शेळ्यांना पुरेसा आणि पोषक आहार दिला जातो. फक्त गोठ्यामध्येच शेळ्या बांधून त्यांना खाद्य न पुरविता माळरानावर त्यांना फिरवून आणले जाते. त्यामुळे त्यामुळे चाऱ्याची बचत होते.

चारा व्यवस्थापन ः

दरवर्षी .....एकरावर दशरथ घास, मका या चारा पिकांची लागवड करतो. तसेच १५ गुंठ्यांवर सुबाभूळ लागवड केली आहे. रब्बी हंगामात एक एकरावर मक्याची लागवड केली जाते. त्यापासून मुरघास तयार केला जातो. यामुळे उन्हाळ्यात चाराटंचाईच्या काळात मुरघासमुळे आधार मिळतो. तसेच सोयाबीनचा भुस्सा आणि भुईमूग पाला दिला जातो. गाभण शेळ्यांच्या आहारात गव्हाचा समावेश असतो.

लसीकरणावर भर ः

शेळ्यांची आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वेळोवेळी विविध आजारांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. दर महिन्याला जंतनाशक औषध दिले जाते. पावसाळ्यापूर्वी जून महिन्यात सर्व शेळ्यांचे लसीकरण केले जाते. गोचीड निर्मूलनासाठी दर सहा महिन्यांनी निर्जंतुकीकरण केले जाते.

शेळीपालनात वडील तारासिंग, आई लक्ष्मीबाई, पत्नी सुलाबाई राठोड यांची मोलाची मदत होते. तसेच बंधू गजानन राठोड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. एकेकाळी रोजगारासाठी आमच्या कुटुंबाला भटकंती करावी लागली होती. परंतु आता शेळीपालनामुळे ही भटकंती थांबली आहे. गोटफार्मला ‘लक्ष्मी गोटफार्म’ असे आईचे नाव दिले आहे.

- बापूराव राठोड, ९२८४२८९८६७

(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com