
ऊस (Suhgarcane) हे एकमेव पीक असून केंद्र शासनाने साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मितीला चालना दिली आहे. इथेनॉलचा वापर इंधनामध्ये २० टक्के करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे.
साखर कारखानदारीला केंद्राच्या धोरणामुळे चांगले दिवस येत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाला प्राधान्य देताना जास्तीतजास्त टनेज देणाऱ्या उसाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) लि. पळसे संचलित मे. दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नाशिक यांच्या वतीने ऊस लागवड हंगाम २०२२-२३ साठी शेतकरी मेळावा शनिवारी (ता. ४) पार पडला.
या वेळी तज्ज्ञांकडून उसाचे एकरी १२० टन उत्पादन घेण्याकामी रासायनिक खतांची मात्रा, जास्तीतजास्त उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जातींची माहिती,
आधुनिक पद्धतीने ऊस लागवडीसाठी सरीचे अंतर, उसावरील कीड व रोग नियंत्रण यावर प्रभावी उपाययोजना, ऊस पिकासाठी पाण्याचा संतुलित वापर या मुद्द्यांवर उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ. भरत रासकर, संचालक शेरझाद बाबा पटेल, सागर गोडसे, निफाडचे संचालक बी. टी. कडलग, व्यवस्थापक बी. एन. पवार, एस. जे. इंगवले आदी उपस्थित होते.
डॉ. रासकर म्हणाले, की गेल्या ९० वर्षांत ऊस संशोधन केंद्रामार्फत उसाची १६ वाणे विकसित करण्यात आली आहेत. त्यात वेळोवेळी आधुनिकतेला वाव दिलेला आहे.
देशातील ७२ टक्के क्षेत्रात झालेली ऊस लागवड ही पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊस जातीची आहे.
डॉ. अरुण देशमुख यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. किरण ओंबासे यांनी खोडवा ऊस उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान, तर डॉ. मंगेश बडगुजर यांनी उसावरील रोग व किड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्तविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. आभार ऊस विकास अधिकारी अरुण पाटील यांनी मानले.
तानाजी गायधनी, विलास आडके, कैलास टिळे, बाबूराव मोजाड, नारायण मुठाळ, लकी ढोकणे, सुकदेव आडके, रामचंद्र टिळे, नामदेव गायधनी, अशोक हारक आदींसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.