
नागपूर : ‘‘राज्यात कौशल्य विकासाला (Skill Development) चालना देण्यासाठी ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) (आयटीआय) चे नूतनीकरण करण्याचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. सहा महिन्यांत याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. लोढा म्हणाले, ‘‘आयटीआयच्या माजी एक लाख ५२ हजार विद्यार्थी तसेच स्टेक होल्डर्स यांच्या मदतीने अभ्यासक्रमात कोणत्या पद्धतीचे बदल हवेत, या संदर्भाने माहिती संकलित करण्यात आली.
त्या आधारे औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करता येईल. जर्मनमधील एका व्यावसायिकाला काही कुशल कामगार हवे आहेत. त्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या आयटीआयमध्ये जर्मन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण करण्यात येईल. त्यामध्ये कौशल्य विकास केंद्र उभारले जातील.’’
‘‘सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांना ४० रुपये याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. १९८२-८३ पासून हीच रक्कम देण्याची तरतूद होती. यापुढे हे विद्यावेतन ५०० रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता ठराव येत्या कॅबिनेट बैठकीत मांडला जाईल,’’ असेही लोढा यांनी सांगितले.
खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्याच्या मागणीवर उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी खुलताबाद येथे विशेष बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्याची घोषणा केली. त्यासोबतच यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवणाऱ्या डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित करण्याचे देखील त्यांनी जाहीर केले.
दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास प्रशिक्षणात सात कोटी २६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, ‘‘सूर्या वायर या कंपनीला प्रशिक्षणासाठी सात कोटी २६ लाख देण्यात आले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर देखील प्रशिक्षणासाठी संबंधित कंपनीतून हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर बाबी तपासून संबंधित कंपनीच्या संचालकांविरोधात वसुलीसाठी जप्तीची कारवाई करता येते का? हे अभ्यासले जाईल.’’
‘यापुढे पदवीदान समारंभ मेडलपुरताच’
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,‘‘ यापुढे विद्यापीठांमध्ये पदवीदान समारंभ केवळ मेडल देण्यापुरतेच होतील. पदवीदान समारंभात पदवी मिळणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री डिजिटल लॉकरमध्ये मिळेल. या डिजिटल लॉकरमधील डिग्रीची प्रिंट विद्यार्थ्याला हवी तेव्हा काढता येईल. त्यावर डिजिटल सिग्नेचर असेल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.