
Jalgaon News निधी आला म्हणून तो खर्च करायचा आहे, वरिष्ठांकडून सूचना आल्या आणि महोत्सव कसाबसा पार पाडा, अशा भूमिकेतून जळगाव शहरात आयोजिण्यात आलेल्या कृषी विभागाच्या (Agriculture Department) धान्य महोत्सवाची (Grain Festival) पावसाने दाणादाण उडविली.
अनेक दिवस पावसाळी व गारपिटीचे वातावरण असताना ताडपत्री, पावसापासून संरक्षण आणि महिलांच्या निवासाची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा या महोत्सवानिमित्त उपस्थित केला. शिवतीर्थ मैदानावर हा महोत्सव शुक्रवार (ता. २८) ते रविवार (ता. ३०) या दरम्यान आयोजिण्यात आला आहे.
त्यात शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जळगाव शहरातही शुक्रवारी दुपारपासून सुसाट वारा, धूळ उडत होती. सायंकाळी पाऊस सुरू झाला. यामुळे या महोत्सवाचे नियोजित उद्घाटन पुढे ढकलण्यात आले.
कारण पावसात कुणी मंत्री, आमदार, अधिकारी आले नाहीत. फक्त शेतकरी आले होते. त्यांनाही पावसाच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आयोजक मात्र आपला बचाव करीत राहीले.
पावसाळी स्थिती लक्षात घेऊन काही शेतकरी या महोत्सवाकडे आलेच नाहीत. महोत्सवात सहभागासाठी काही शेतकरी आपले धान्य, फळे घेऊन शुक्रवारी दाखल झाले होते.
त्यांचा सत्कार यात करण्यात आला. परंतु सायंकाळी पावसाने सर्वांची दाणादाण उडविली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी प्लॅस्टिक कागद आणला.
त्यात त्रेधातिरपीट उडाली. महोत्सवासाठी उभारलेला टेंट ओला झाला. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. परंतु पहिला दिवस वाया गेला किंवा शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा ठरला. यावरून शेतकरी कृषी विभागावर टीका करीत आहेत.
उद्घाटन शेतकऱ्याच्या हस्ते केले असते...
उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी मंत्री, आमदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करायचे नियोजन केले होते. कारण अधिकारी व मंत्री, आमदार यांना सायंकाळी वेळ होता. सकाळपासून शेतकरी या महोत्सवात आले.
पण केवळ मंत्री, आमदार यांच्यासाठी उद्घाटनाची वेळ सायंकाळी ठेवली. त्यात पाऊस आल्याने उद्घाटनच झाले नाही. मंत्री, आमदारांऐवजी शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन केले असते, तर शेतकऱ्यांनाही आनंद झाला असता आणि उद्घाटनही लांबले नसते, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.