
Rural Development News महाड ः तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार (Gram Panchayat Administration) सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांची तब्बल ३३ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील गावगाडा कोलमडला आहे. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीतील महत्त्वाचे पद असून तीन-चार वर्षांपासून ही पदे भरली न गेल्याने गावांतील विकासकामाचा (Rural Development) खोळंबा होत आहे.
ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी लोकशाही संस्था म्हणून ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे महत्त्वाचे पद मानले जाते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणूनही ओळखले जाते.
गावांतील विविध कामे ग्रामसेवकांमार्फत केली जातात. त्यामुळे नागरिक व सरकारमधील दुवा ग्रामसेवक असतो. परंतु २०१८ पासून राज्यामध्ये भरती न झाल्याने तसेच कोरोना काळामुळे बदल्याही रखडल्याने ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत.
महाड तालुक्यांमध्ये जवळपास ३३ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. तालुक्यांमध्ये एकूण १९६ गावे असून १३४ ग्रामपंचायती आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात ५४ ग्रामसेवक काम करत असून ग्रामसेवकांची ८७ पदे मंजूर आहेत. त्यामुळे तालुक्यात अजूनही ३३ ग्रामसेवकांची गरज आहे.
महाड तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका असल्याने या ठिकाणी ग्रामसेवकांची अत्यंत निकड आहे. परंतु रिक्त पदांमुळे एकेका ग्रामसेवकाला तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळावा लागत आहे.
सर्वच ठिकाणच्या दुर्गम ग्रामपंचायतीत पोचणे ग्रामसेवकाला देखील अडचणीचे होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कार्यरत ग्रामसेवकांचा कामाचा ताण देखील वाढला आहे.
विविध दाखले व योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकावर अवलंबून राहावे लागते. ग्रामसभेतही महत्त्वाचे निर्णय होतात. परंतु अतिरिक्त पदभारांमुळेअनेक गावांतील ग्रामसभा रखडल्या आहेत.
ग्रामसेवकांकडील कामे
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतमधील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, विविध शासकीय योजना राबवणे, आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवणे, ग्रामसभा, मासिक सभा बोलवणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, विविध कर वसूल करणे, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी करणे अशी अनेक कामे ग्रामसेवकांना करावी लागतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.