
मनोर : पालघर तालुक्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणांवर महसूल विभागाकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी बोईसर पूर्वेकडील बेटेगावच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
चिल्हार-बोईसर रस्त्यालगतच्या बेटेगाव पोलिस चौकीलगत आणि पाठीमागची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
या कारवाईत टाइल्सचे दुकान, दोन गोदामे, सर्व्हिसिंग सेंटर, एक कार्यालय, नर्सरी, दहा खोल्यांची चाळ, एक मेडिकलचे गाळे, एक दवाखान्याचे गाळे आणि चार खोल्यांची चाळ जमीनदोस्त करण्यात आली आहे.
गायरान जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी मोहीम हाती घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत गायरान जागेवरील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
याबाबत तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायत हद्दीतील ५४३ ठिकाणच्या गायरान जमिनी ताब्यात घेण्यासाठी महसूल विभागाकडून ग्रामपंचायतींना कळवण्यात आले होते. ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम दोन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
येत्या दोन दिवसांत पंधरा गावांमधील गायरान जागेतील अतिक्रमणे महसूल विभागाकडून हटविली जाणार आहेत. या तोडक कारवाईदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.